सफरचंद - एक श्रीमंताचे_फळ.
ललित :
सफरचंद - एक श्रीमंताचे_फळ.
माझी सुरुवातीची परिस्थिती हलाखीचीच होती. मला माझ्या शिक्षणासाठी माझे ताताजींनी बरीच आर्थिक मदत केली, पण त्यांचा एकही रुपया विनाकारण खर्च केला नाही. तसेच पैशाचा उडावाही केला नाही, उपास तर चिकटून बसलेलाच होता शिक्षणाच्या काळात. अशात तर मिजास किंवा मोठा खर्च म्हणून केलोच नाही. स्वतः नाश्ता न करता त्याच पैश्यात मी नोकरी संदर्भ साप्ताहिक व मासिके खरेदी करायचो. ताताजींचा फुकटचा पैसा आहे म्हणून गरजेपेक्षा अधिक मागितला नाही. हिशेबानेच व जपून पैसे वापरले .
मला या फळाचे केव्हापासून चे आकर्षण होते ते समजत नाही. पण हे फळ आपल्यासाठी नाहीच याची जाणीव तर बरीच पहिलेपासून मला झाली होती. मी माझ्या शैक्षणिक वाटचालीत दोन वर्षे अवकाश घेतला आहे.बऱ्याच जणांचा शैक्षणिक खंड 10 किंवा 12 वी नंतर असतो, पण मी याला अपवाद आहे. माझ्या शिक्षणात 10 वी व 11 वी नंतर खंड पडला आहे. तत्कालीन परिस्थिती मुळे. असो.
तर मी लिहीत होतो ते या #महागड्या फळाबद्दल. मी चंद्रपूर ला जाणे येणे करायचो. व माझा बराच वेळ बसस्टँड वर जायचा तेही जुनोना पोंभुर्णा हाल्टिंग बस ची वाट बघण्यात. त्या वेळेस हे सफरचंद मला दृष्टीस पडायचे हातगाडी किंवा विक्री ठेल्यावर. तेव्हापासूनच या फळाचे आकर्षण असावे कदाचित. त्याला कारणही तसेच होते. कुणीही सर्वसाधारण प्रवासी, कामगार किंवा जवळपास असलेले वाटसरू हे फळ घ्यायचेचं नाही. म्हणूनच. दोन तीन दिवस तर हे फळ विकत घेणाऱ्याचे दर्शनही व्हायचे नाही. मी मात्र त्या महान असामी च्या शोधात असायचो. तेवढाच विरंगुळा.
हे फळ जो विकत घेत असेल त्याबद्दल माझ्या मनात वेगवेगळे विचार यायचे. #डोक्यात #विचारांचे व #पोटात #भुकेचे काहूर माजायचे. किती ही श्रीमंती व कोण हा महापुरुष. मला तर सफरचंद घेणारा गर्भश्रीमंतच वाटायचा. तो तोंडात चांदीचे चमच घेऊन या जगात अवतरला असेल असे म्हणून स्वतःच समाधान करून घ्यायचो.
माणूस जन्माला आला तर खूप श्रीमंत असावा, नाहीतर एकदम रंक ; कफल्लक, भिकारी,निरिच्छ व डोक्यात कोणतेही विचार न येणारा. पण आपल्यासारखा मध्यम, सर्वसाधारण असूच नये असे मनोमन वाटायचे.
असा एखादा महापुरुष दिसला तर त्याविषयी, त्याच्या श्रीमंती विषयी मनात येणाऱ्या विचारांनी भूक मिटून जायची. व आपल्यालाही एक दिवस #सफरचंद_विकत_घेणारा_व्हायचंय हीच मनीषा व्हायची. कदाचित याच व अशाच दिवसा पाहिलेल्या स्वप्नांमुळे हे यश मिळालेले असेलही. ही तर सुरुवात होती पाहिलेल्या आभाळभर मोठ्या स्वप्नांची. मात्र अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये येणारे सततचे अपयश पाहून खूप नैराश्य यायचे तेंव्हा माझ्या ताताजींनी माझ्यावर जो विश्वास दाखविला व माझ्यात एक विजिगिशु इच्छाशक्ती जागविली ,माझ्यात चैतन्य निर्माण केले. त्यामुळे हे मनोरथ पूर्णत्वास आले.
दोन वर्षांच्या संबंध प्रवासात मी एकदाही हे श्रीमंतांचे फळ खाऊ शकलो नाही. मात्र नात्यातील कुणी प्रकृती बिघडल्याने दवाखान्यात ऍडमिट असतांना हेच फळ कित्येकदा घेऊन नेलो आहे.(स्वतःला नाही.)
त्यानंतर मी या फळाबद्दल घरी चर्चा करायचो. खूप काही नौलिक बोलायचो . भारतात सिमला, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर यासारख्याच प्रदेशांत येणारे हे फळ सर्वत्र का येत नसावे व कोणत्याही सर्वसाधारण गरिबाला खायला का मिळत नाही यासाठी देवाला दोष द्यायचो. या अश्या विचारांमुळे माझ्या मोठया भावाला ही खात्री झाली की माझा भाऊ एवढ्यात हे फळ विकत घेणार नाही. व होतेही तसेच.
एक दिवस अशाच विवंचनेत सिटीतुन मी चाललो होतो तेंव्हा हे फळ जटपुरा गेट मागे रस्त्यावर एक महिला जमिनीवर टोपली घेऊन विकत होती. या फळाची किंमत महाग असल्याने मी सहसा कधी विचारलो नाही. त्या दिवशी रस्त्यावर हे रत्न दिसताच मी सहज किंमत विचारली. ती बाई उत्तरली, " पन्नास रुपये किलो. " मी अवाक होऊन पाहतच राहलो व म्हणालो, " आँ ! " तर ती बाई म्हणाली, " चाळीस दे भाऊ." मी आश्चर्यचकित होऊन अर्धा किलो सफरचंद घेतले व रोजच्या सारखा रात्रौ उशिरानेच बसने घरी आलो.(मुळात माझ्या घरी बस येत नाही, रात्रौ फाट्यावर उतरून अडीच किलोमीटर चालून खेड्यातील लोक झोपी जायचे त्या वेळेवर घरी आलो). मात्र दुसऱ्या दिवशीचा अनुभव वेगळाच होता. माझ्या मोठया भावाचा विश्वासच बसेना की मी ते सफरचंद (रत्न) विकत आणले आहे. तो म्हनू लागला की महाकाली मंदिरात वगैरे कुणी वाटप केले असतील व तिथून योगा (मी) आणला असेल. माझ्या वडिलांनाही काहीसे तसेच वाटले. माझी अशी गत झाली. नेमके ते सफरचंद थोडे damage असावेत म्हणून जास्त प्रमाणात त्याचा आस्वाद घेता आला नाही. ते लवकरच खराब झालेत.
दुरून पाहिल्यावर लालसर व चकचकित दिसणारे हे #रत्न मला फार आकर्षित करायचे. मी या फळाकडे तहानभूक विसरून पाहतच रहायचो. संबंध पूर्ण सफरचंद खायचा योग आला तो माझे B. Ed. झाल्यावर एक दीड वर्षांनी. तोही माझ्याबरोबर पोंभुर्णा इथे शिकलेल्या एका मैत्रिणीमुळे. मी जुनोना फाटा इथे बसची वाट पहात उभा होतो तेव्हा माझी ही मैत्रीण आली व तीही गावी जाणार होती. अर्धा तास वगैरे झाला असेल, तिला भूक वाटू लागली. तिच्या बॅग मध्ये दोन सफरचंद असावेत. सुरुवातीला तिने एक सफरचंद काढला व तो फोडण्याचा अयशस्वी विचार करू लागली.(प्रयत्न नाही.) तिथे चाकू भेटणे किंवा सफरचंद चे दोन भाग करणे शक्यच नव्हते म्हणून तिने तो सफरचंद खायला सुरुवात करून मला बॅग मधून दुसरा सफरचंद काढून दिला. संबंध सफरचंद खाण्याची माझी ही कित्येक वर्षानंतर ची पहिलीच वेळ. ती मैत्रीण तेव्हा जॉब करीत होती हे वेगळे सांगायला नकोच.
आता मात्र माझ्या वसतिगृहातील मुलांना नेहमी सफरचंद खायला मिळते. व माझा मुलगा सुद्धा कधीकधी अर्धे सफरचंद कुरतडून फेकून देतो. तेव्हा माझ्या मनाला कसेसेच होते, नकळत डोळ्याच्या कडा ओल्या होतात. पण काय करू...... तो तेवढा मोठा नाहीच. आणि त्याचा बाप नोकरीवर आहे नं !
- © #योगेशराव_वासुदेवराव_धोडरे.
राजुरा (पोंभुर्णा), जिल्हा - चंद्रपूर.
मोबा. क्र. 94 201 38951.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!