संस्कृती म्हणजे नेमके काय हो ?
संस्कृती म्हणजे नेमके काय हो ?
🟣
डाॅ. स्वप्ना लांडे
अकोला
🟣
संस्कृती म्हणजे प्रकृतीत बिघाड होऊ नये म्हणून तिच्यावर करायचे संस्कार होत. म्हणजेच संस्कृती बनते ती संस्कारांतून. एका अर्थाने आपले संस्कार महान तर, आपली संस्कृती गौरवशाली. म्हणूनच संस्कृती महान ठरण्यासाठी काही मूल्यांचे पालन होणे नितांत गरजेचे असते. आपण करतो का या मूल्यांचे पालन? ही मूल्ये खरे तर मानवी मूल्ये असतात. या मानवी मूल्यांचा प्रवास हा शिकवणुकीकडून वागणुकीकडे असा असतो . समाज निरोगी रहावा यासाठीच तर ही मूल्ये तयार केलेली असतात. ही मूल्ये जितकी व्यक्तिगत तितकीच सामाजिक असतात. माणसा- माणसामधील नाते सुदृढ बनविण्यासाठीच या मूल्यांची निर्मिती झालेली असते. मानवाच्या वास्तव जीवनाशी या मूल्यांचा घनिष्ठ संबंध असतो. देव, धर्म या संकल्पनेशी काहीही संबंध नसतो. कधी काळी जेव्हा धर्माचा पगडा माणसांच्या दैनंदिन जीवनावर होता, त्या काळी मानवी मूल्ये रुजविण्याचे काम धर्माने केले असेलही परंतु आज तरी या मूल्यांचा तसा संबंध जोडणे किंवा सांगड घालणे हास्यास्पद आहे.
कारण बदल स्वीकारुन लवचिक व परिवर्तनशिल संस्कृती स्वीकारण्याऐवजी आपण रुढी, परंपरा, चालीरीती यांनाच संस्कृतीची बैठक समजून पुढे चालतो.
अनेकदा लोक म्हणतात, धर्माची भीती घातली तर, लोक मूल्ये पाळतील. मूल्ये टिकली तर संस्कृती टिकेल. पण समाजाचे नीट परीक्षण केल्यास असे दिसते की, धर्माचे ठेकेदारच नैतिक मूल्यांची पायमल्ली करतात. हे तेच लोक आहेत जे, आमचा धर्म सहिष्णुता शिकवतो, आमच्या धर्मात हिंसेला अजिबात स्थान नाही हे सांगताना, ते मान्य न करणाऱ्या लोकांचे मुडदे पाडायला कचरत नाहीत. गाईला माता मानताना माणसाचे रक्त सांडण्यात त्यांना काहीच गैर वाटत नाही. धर्माने पालन न करता माणूस पुण्यवान असू शकत नाही काय? संस्कृती टिकण्यासाठी कशाला हवे माणसाचे आध्यात्मिक असणे? पुण्यासाठी कशाला हवे मोक्षाचे गाजर? कशाला हव्यात स्वर्ग अन् नरकाच्या खुळचट कल्पना? या अशा संस्कारांमुळेच तर संस्कृतीच्या नावाखाली विकृतीचा धुडगूस पहायला मिळतो.
संस्कृतीच्या व्याख्येत अनेक गोष्टी बसतात आपल्याकडे आणि ह्या ठराविक गोष्टींचे पालन एखाद्याने केले नाही की, आपल्या संस्कृतीची विल्हेवाट लागलीच म्हणून समजा! सौभाग्यवती स्त्रीने कुंकू लावले नाही आणि विधवा स्त्रीने कुंकू लावले की संस्कृती बिघडते. मोठ्यांच्या पाया पडल्या नाही की, संस्कृती बिघडते. डोक्यावरुन पदर घेतला नाही की, संस्कृती बिघडते कारण आम्ही वाचलेले असते, आमची संस्कृती फार थोर आहे. थोरामोठयांचा आदर करणे आमच्या संस्कृतीचे लक्षण आहे. मातृदेवो भव! पितृ देवो भव! स्त्रियांचा सन्मान हा आमच्या संस्कृतीचा भाग आहे आणि इथेच स्त्रियांवरील अत्याचाराचे प्रमाण देखील लक्षणीय आहे. वृद्धाश्रमातील मातापिता दयनीय अवस्थेत मरणाच्या दारात शेवटच्या घटका मोजत आहेत. पूजाअर्चा करणारी माणसं सुसंस्कृत आणि मानवी मूल्यांचे पालन करणारी , पण धार्मिक या व्याख्येत न बसणारी माणसं असंस्कृत असा समज इथे रुढ आहे. दही, दूध, तूप, तेल गरजू, गरीब, जिवंत व्यक्तीला न देता दगडाच्या मूर्तीवर वाहणारे लोक संस्कृतीरक्षक समजली जातात. त्यांना सन्मान दिला जातो. परंतु याउलट दगडाच्या मूर्तीपेक्षा माणुसकी जपणाऱ्याची मानहानी केली जाते. लांब बाह्यांचे ब्लाऊज, साडी, ठसठशीत कुंकू, मंगळसूत्र असे राहणीमान असलेली स्त्री संस्कारी. याउलट फॅशनेबल राहणारी स्त्री मात्र असंस्कृत. या बाबतीतील लोकांची विधाने फारच हास्यास्पद असतात. व्यक्तिमत्त्व विकासासाठी किंवा आपले कर्तृत्व जगाला दाखवण्यासाठी बॉब कट, जीन्सची पॅन्ट लागत नाही अथवा शॉर्ट स्कर्ट लागत नाही. तर वर उल्लेखलेले साधे राहणीमान असलेल्या अशा संस्कारी व्यक्तींमुळे आपली संस्कृती महान ठरते .यावरून हे ध्यानात येते की, असे बोलणाऱ्या लोकांच्या काही धारणा किती पक्क्या आहेत. (चिकित्सक दृष्टीने पाहिल्यास ज्या पूर्णपणे चुकीच्या आहेत.) खरं तर विद्वत्ता किंवा सुसंस्कृतपणा हा कुणाच्या राहणीमानावरून जोखता येत नसून, आचार विचारावरून जोखायचा असतो. बरेचदा राहणीमान हे परिस्थितीनुसार, वेळेच्या उपलब्धतेनुसार, स्वतःच्या सोयीनुसार बदलावे लागते. एकेकाळी डोक्यावर पदर घेतलेली, अंगभर साडी नेसलेली स्त्री 'संस्कारी' या व्याख्येत बसत असेलही . पण आज मुंबईच्या लोकलने प्रवास करणाऱ्या स्त्रीला साडीपेक्षा मिडी किंवा जिन्स जास्त सोयीची वाटत असेल तर त्यात वाईट काय ? सांगताना वाईट वाटतं, समाज व्यक्तीच्या असण्यापेक्षा दिसण्यावर भाळतो. रूढ तेच नियम पाळतो, पूर्वापार मनात रुजलेल्या संस्काराच्या व्याख्येच्या फूटपट्टीने तिला मापतो आणि या व्याख्येत न बसणाऱ्या व्यक्तीला सरळ सरळ संस्कारहीन ठरवून मोकळे होतो. म्हणूनच म्हणावेसे वाटते संस्कृती म्हणजे दिसणे नव्हे. तर संस्कृती म्हणजे व्यक्तीचे असणे अर्थात काळानुरूप बदलणाऱ्या मूल्यांसह! कारण संस्कृती म्हणजे परंपरा नाही तर परिवर्तनशील मूल्यांची एकसंघ बांधणी असते, परिस्थिती व काळानुरूप मुल्यांची संस्कार क्षमतेची तिव्रता लोकधारेतून कमी जास्त प्रमाणात प्रभाव सोडत असते. हा संस्कार जाती , धर्मापेक्षा खूप मोठा असतो. हा संस्कार विश्वाच्या कोणत्याही कोपऱ्यात उठून दिसला, माणसाला धरून चालणारा असला तरच संस्कृती महान ठरेल. चला तर मग संकल्प करूया! मानवतेच्या संस्कृतीची स्थापना करूया!



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!