“मुल तालुक्याच्या लेकीचा देशपातळीवर डंका; राष्ट्रपती पुरस्काराने गौरव”

संघर्ष, जिद्द आणि सेवाभावाचा गौरव
उज्वला सोयाम यांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कार


मूल : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत, दुर्गम आदिवासी भागात निस्वार्थ आरोग्यसेवा देत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या उज्वला महादेव सोयाम यांना देशातील प्रतिष्ठेचा राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कार प्रदान करण्यात आला. दिनांक 12 मे रोजी राष्ट्रपती भवन येथे महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू Droupadi Murmu यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.
जानाळा-मूल येथील शिक्षक व प्रतिष्ठित नागरिक लक्ष्मण सोयाम यांची उज्वला या बहीण असून, त्यांची नाळ मूल तालुक्याशी घट्ट जोडलेली आहे. त्यामुळे त्यांच्या या राष्ट्रीय सन्मानामुळे संपूर्ण मूल तालुक्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुळच्या यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील दहेगाव येथील उज्वला सोयाम यांचा जीवनप्रवास संघर्षमय राहिला. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या उज्वला या सहा भावंडांमध्ये तिसऱ्या क्रमांकाच्या आहेत. आर्थिक अडचणींवर मात करत त्यांनी आश्रमशाळेत शिक्षण घेतले. बोटोनी (ता. मारेगाव) येथे नववीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर नागपूर आणि डोंगरगाव येथे पुढील शिक्षण घेतले.
नर्सिंगचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी चंद्रपूर येथील डॉ. मुठाळ यांच्याकडे चार वर्षे खाजगी सेवेत काम केले. त्यानंतर 2001 मध्ये बालविकास प्रकल्पांतर्गत सहाय्यक परिचारिका म्हणून शासकीय सेवेत प्रवेश केला. सेवेत रुजू झाल्यानंतर त्यांनी दुर्गम आणि नक्षलग्रस्त अहेरी भागात सलग आठ वर्षे सेवा बजावली. लहान मुलीला सोबत घेऊन अतिदुर्गम आदिवासी पाड्यांवर जाऊन आरोग्यसेवा, लसीकरण आणि पोलिओ मोहिमा यशस्वीपणे राबविल्या.
अत्यंत कठीण परिस्थितीतही त्यांनी कामाप्रती असलेली निष्ठा कायम ठेवली. बदली प्रक्रियेत अन्याय झाल्यानंतरही न खचता त्यांनी सेवाभावाने काम सुरू ठेवले. ग्रामीण आणि गरीब रुग्णांना मदत करण्यासाठी त्या सदैव तत्पर राहिल्या. प्रसूती असो किंवा इतर वैद्यकीय उपचार, गरजूंसाठी उज्वला सोयाम यांचे योगदान मोलाचे ठरले आहे.
उज्वला सोयाम यांच्या या समर्पित सेवेला यापूर्वी जिल्हास्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. अखेर त्यांच्या अथक परिश्रम, जिद्द आणि सेवाभावाची दखल घेत केंद्र शासनाने त्यांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कार जाहीर केला.
या सन्मान सोहळ्यास त्यांच्या आई राधाबाई सोयाम, भाऊ लक्ष्मण सोयाम आणि मुलगी कृपा उपस्थित होते. उज्वला सोयाम यांच्या यशामुळे संपूर्ण सोयाम परिवार, जानाळा गावकरी तसेच आरोग्य विभागातील सहकारी यांच्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!