पावसाळ्यानिमित्त विशेष लेख-
पावसाळ्यानिमित्त विशेष लेख-
लेखक- महेंद्र सोनेवाने, गोंदिया
मो. 9421802067
संकलन- अतुल खोब्रागडे, गोंदिया
*पाऊसाच्या आठवणी*
*मला आवडतो पाऊस , मनाला फुलवणारा*,
*अन् तेवढया मायेनं , ओलावा देणारा*
पावसाचे दिवस होते बाहेर खुप काळे ढग जमलेले होते . अनिश्चितपणे ऊन आणि पाऊस अगदी पाठशिवणीचा खेळ खेळत होते . आज न कळत खिडकीतून बाहेर जमलेले ढग बघताना मनात जुन्या आठवणींचे ढग जमून आले . पाहाता पाहाता मन केव्हा भूतकाळात गेलं काही कळलच नाही . मे महिण्याचा शेवट होऊन जून महिण्याची सुरुवात झालीच होती. मृग नक्षत्राच्या आसपास पावसाची चाहुल लागली. शाळा सुरु झाल्या होत्या व आता छत्री आणि रेनकोड बाहेर काढायचे दिवस आले होते . छत्री काढल्यावर आपल्याला कळायचे की तीचे तर एक - दोन काडया तुटल्या आहेत. मग काही दिवस तशीच छत्री वापरायची. अर्धे ओले होत बाहेर पडायचे . शाळेत जाताना फक्त आपला दप्तर सुखरुप राहिला पाहिजे एवढीच त्या छत्रीकडून अपेक्षा होती . शाळेतून परत येताना एखादया मुलीने “ मी तुझ्या छत्रीत येऊ का ? " अस म्हटलं तर त्या छत्रीची मोठी कीव येत होती. नाही न म्हणता , “ हो , चाल सोबत " असं म्हणून आपण ओले होत तीचं मुंडकं त्या छत्रीत घेऊन आम्ही जात होतो. ओले तर दोघोही होत होतो पण छत्रीत येण्याचे भाग्य लाभत होते. आपल्या एक दोन वहया पुस्तक छत्रीच्या वरच्या काडयामध्ये अडकवून ठेवून आम्ही त्या छत्रीचा पुरेपुर उपयोग करून घेत होतो . पुढच्या वर्षी आपण नविन छत्री घेऊ अस ठरवून त्या बिघडलेल्या छत्रीवरच तो पावसाळा काढायचा .
*जसे अतुट नाते असते , पाऊस आणि छत्रीचे*
*तसेच काही नाते असते , आपले नि पावसाचे*
*पाऊस येतो आणि जोतो*
*साथ छत्रीची असू दे असेच तो सांगतो*.
पाऊस दररोज येत नव्हता. कधी यायचा तर कधी बराच उशीरा याचचा. पण पहिला पाऊस पडल की काय मस्त वाटायचे. आम्ही अगदी लहान होतो तेव्हा ही पावसात खुप मज्जा घ्यायची. कागदाची नाव तयार करुन पाण्यात टाकायची. चिखलात ओले होत एक दुसऱ्याला आले करायची खुप मौज करत होतो. साचलेल्या पाण्यात उडी मारुन दुसऱ्याला पण ओढायचे आणि पाणी उडवायचे त्याच्यात जो आनंद मिळत होता तो शब्दात व्यक्त करणे कठिण आहे. एकदा खुप पाऊस आला. घराबाहेरचे अंगण व मोकळया मैदानात पाणी अगदी गुडघ्या पर्यंत साचलेले पण ते वाहतही होतं. मग मी आणि माझा मित्र आम्ही दोघेही त्या पाण्यात खुब खेळलो अनवानी पायानं त्या पावसात कितीदा तरी आम्ही भटकत होतो. शेवटी थकून जेव्हा घराकडे जायला निघालो तेव्हा कपडयाकडे लक्ष गेलं तर घरी गेल्यावर काय झालं असेल ते काही सांगायलाच नको.
पावसात एक गोष्ट नक्कीच आठवते की शाळेच्या रस्त्यावर चिखल फार असायचा. आणि शाळेत जाता येताना मुलामुलींपैकी कोणाची तरी चप्पल चिखलात घसरुन तो चिखलात पडलेला असायचा . आणि त्याच्यावर सर्व मुलं हसायचे या सुखाची मज्जा मात्र खुप घेतली . तशी वेळ मला कधी आली नाही.
शाळेत जायचे ते दिवस. पावसाळ्याच्या दिवसात शिक्षकही सांगत होते की पावसात ओले व्हायचे नाही तरी हो म्हणून कधीच न ऐकायचे. पाऊस आल्यावर पावसाची मज्जा घ्यायची ओले व्हायचे. दिवसभर ओल्या कपडयांनी राहायचे. तरी काही होत नव्हते. पावसात भिजण्यासाठी कधी आपल्या शिक्षकांचे मार कधी आई बाबांचे मार ही खावे लागे. दप्तर झिल्लीच्या पाकिटात भरुन आम्ही फक्त त्याची काळजी घेत होतो. युनिफार्म ओला झाला म्हणून कोणतेही कपडे घालून शाळेत जात होतो.
सुटीच्या दिवशी किंवा शाळेतून आल्यावर आम्ही खुपसणी नावाचा खेळ खेळत होतो. एक लोखंडी सळाखीचा तुकडा घेऊन औल्या झालेल्या मातीत तो जमिनीत खुपसेल असा फेकण्याचा काहीतरी तो प्रकार होता. ज्या मित्राची सळाख जमिनीत खुपसली नाही तिथुन त्याला लंगडी करत सुरुवातीच्या ठिकाणी यावं लागत होतं. या दिवसात कोणताही खेळ खेळलं तर कपडे भरायचे नाही तर भरवायचे जेव्हा घरी परत यावे तेव्हा पुन्हा मार खायचे. असे ते दिवस कधीही न विसरणारे होते.
पावसाळ्याच्या दिवसात फाफे , फुलपाखरु यांना पकडायचे. कधी कधी तर त्यांना एका धाग्याने बांधून हवेत उडवायचे. हे सर्व करता करता दिवस कसे भुर्रकन् निघून गेले कळलेच नाही. पहिला पाऊस त्या पावसात गरम गरम चहा किंवा खालेल्ली गरम गरम भजी आजही खायला आठवते.
कॉलेज चा पहिलाच दिवस. त्या दिवशी पाणी भरपूर आले. सुट्टी झाल्यावरही पाऊस काही थांबत नव्हते. मी माझ्या पुस्तकांना एका मित्राकडे देऊन मी माझ्या सायकलने आधि कॉलेजच्या मैदानात दोन तीन राऊउ फिरलो व नंतर पूर्ण ओला होत घरी परतलो. ओला चिंब होऊन जेव्हा घरी आलो तेव्हा माझ्या मोठया भावानं मला खुप दाटलं होतं. तो ही प्रसंग मला आठवतो. तो त्या वर्षिचा पहिलाच पाऊस होता . पहिल्या पावसाचा पहिला थेंब जेव्हा पृथ्वीवर पडतो व त्या जमिनीची जी गंध येते त्याचा काय तो मोहक गंध घेऊन त्या पावसात भिजण्यात मनमुराद आनंद मिळतो.
पहिल्या पावसाचे आनंद घेण्यास सर्व उत्सुक असतात. आणि आपआपल्या जीवनात याचा अनुभव सर्व घेतात .
*पाऊस पडत असताना,*
*मातीचा सुगंध आणि गार वारा*
*मला नेहमीच आवडतो*
*मुसळधार पावसाच्या बरसणाऱ्या धारा*
_________________________
महेन्द्र सोनेवाने , गोंदिया
मो. 9421802067


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!