बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी #crop #seeds

बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी
वासु वाकडे


भारतामध्ये बियाण्यासाठी जो कायदा करण्यात आला आहे. त्यात भारतीय बियाणे कायदा 1996 असे नाव आहे. हा कायदा सर्व भारतात 1 ऑक्टोबर 1969 पासून अमलात आला आहे. पेरणीसाठी दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देणे हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. यातील सर्व नियम आणि अटी देशात लागू आहे. कायद्यानुसार देशातील विविध भागासाठी किंवा स्थानिक दृष्ट्या महत्त्वाच्या जाती अगर पिके अधिसूचित जाती (नोटीफाईट व्हेरायटी) म्हणून जाहीर केल्या आहे. त्या जातीच्या उत्पादन आणि विक्री करिता हा कायदा लागू असतो.
बियाण्याची निवड:- आपल्या परिसरातील कृषी विभाग येथील कृषी अधिकारी, शास्त्रज्ञ सोबत चर्चा करून नवीन तसेच सुधारित, संकरित वाणाची माहिती घ्यावी. उत्तम प्रतीचे खात्रीशीर व नोंदणीकृत बियाणे विक्रेत्याकडून नावाजलेल्या कंपनीचे बियाणे खरेदी करावे. पूर्वीच्या हंगामात अन्य शेतकऱ्यांनी पेरलेल्या बियाण्याच्या अनुभवाची माहिती करून घ्यावी. शक्यतो कृषी विद्यापीठे किंवा विद्यापीठाचे संशोधन केंद्राकडे बियाणे उपलब्ध असेल तर तिथून ते खरेदी करावे. बियाण्याच्या पिशवीला प्रमाणीकरण यंत्रणेने बियाण्याच्या गुणवत्तेविषयी असणारी (खुणचिट्ठी) टॅग लावलेला असतो तो तपासून पाहणे. बियाण्याच्या बॅगवर माहिती छापलेले असते. त्याविषयी माहिती व्यवस्थित वाचून तपासून घ्यावी. बियाणे खरेदी करताना हा टॅग खूप महत्त्वाचा असतो.
बियाण्याचे प्रकार:- पीक पैदासकरांनी विकसित केलेले नवे संकरित अथवा सुधारित वाण शेतकऱ्यापर्यंत शुद्ध आणि चांगल्या स्थितीत पोहोचाव्यात, यासाठी त्यांचे बीजोत्पादन शास्त्रीयदृष्ट्या चार टप्प्यात घेतली जाते. त्यामध्ये १) मूलभूत बीजोत्पादन २) पायाभूत बीजोत्पादन ३) प्रमाणित बीजोत्पादन ४) सत्यप्रत बीजोत्पादन असे टप्पे आहेत. यालाच बियाण्याचे प्रकार असेही म्हणता येईल.
बियाण्याच्या बॅग वरील खुणचिट्ठी:- अधिसूचित जातीच्या बियाण्याची विक्री करताना बियाण्याच्या बॅगवर बियाणे कायद्यामध्ये निर्देशित केलेल्या बियाणे प्रतिच्या कमीत कमी मूल्याच्या दर्जा दाखवणारी माहिती टॅग असणे आवश्यक आहे. बियाण्याच्या प्रकाराप्रमाणे वेगवेगळ्या रंगाचे टॅग प्रमाणित करण्यात आले आहेत. यामध्ये पायाभूत बियाण्यासाठी पांढरा, प्रमाणित बियाण्यासाठी निळा, मूलभूत बियाण्यासाठी पिवळ्या रंगाची (खुणचिट्ठी) लावलेली असते. सत्यप्रत बियाण्यासाठी हिरव्या रंगाचा टॅग असतो. त्यावर खालील माहिती असणे आवश्यक आहे.
१- पिकाचे नाव
२- जाती आणि प्रकार
३- गट क्रमांक
४- बीज परीक्षणाची तारीख
५- उगवणशक्ती टक्के
६- शुद्धतेचे प्रमाण
७- पिशवीतील बियाण्याचे एकूण वजन
८- बियाण्याचा वर्ग
९- बियाण्याचा सार्थ कालावधी
१०- विक्रेत्याचे नाव आणि पत्ता
११- बियाणे प्रमाणित करणाऱ्या अधिकाऱ्यांची सही आणि हुद्दा याचा समावेश असतो.

याशिवाय बियाण्यास कीड किवा रोग प्रतिबंधक कीटकनाशकाची प्रक्रिया केली असल्यास त्याचा उल्लेख आणि नावे टॅगवर असावीत. कीडनाशकाची नावे ठळक अक्षरात आणि माणसे, जनावरे, पक्षी यांच्या खाण्यास अयोग्य असा खुलासा त्यात असला पाहिजे.
बियाणे खरेदी करताना घ्यावयाची काळजी:-
१. बियाणे खरेदी करताना खरेदीची पक्की पावती घ्यावी. त्या पावतीवर खरेदी करणाऱ्या चे नाव, पिकाचे व जातीचे नाव, गट क्रमांक, उत्पादकाचे नाव व पत्ता, विक्रेत्याची सही इत्यादी नोंदी करून पावती घ्यावी. २. बियाणे नेहमी परवानाधारक कृषी केंद्र विक्रेत्याकडूनच घ्यावे. ३. बियाण्याची वैधता तपासणी दिनांकापासून ९ महिने असते तर नूतनीकरण केलेल्या बियाण्याची वैद्यता ६ महिन्यांपर्यंत असते. याबाबी पाहूनच बियाणे खरेदी करावे. ४. बियाणे खरेदी करताना पिशवीच्या लेबलवर दिलेली माहिती तपासून पहावी. त्यामध्ये प्रामुख्याने बियाण्याची उगवणक्षमता, भौतिकशुद्धता, बियाण्याचे चाचणीची तारीख इत्यादी काळजीपूर्वक वाचावे. ५. प्रमाणित बियाण्याच्या खुणचिट्ठीवर अधिकाऱ्याची सही असल्याची खात्री करून घ्यावी.
पेरणी करताना घ्यावयाची काळजी:- १. पेरणीसाठी पिशवीतील बियाणे काढताना पिशवीच्या तळाकडील म्हणजेच (खालच्या) बाजूस छिद्र पाडून बियाणे बाहेर काढावे. बॅगवरील टॅग काढू नये. रिकामी पिशवी आणि त्यामध्ये काही बियाणे शिल्लक ठेवून खरेदी केलेली पावती जपून ठेवावे. २. पेरणी करताना शक्यतो दोन वेगवेगळ्या लाटचे बियाणे एकत्र करून पेरणी करू नये. पहिला शेजारी दुसरा लाट पेरावा. ३. जमिनीत योग्य ओलावा असताना पेरणी करावी. पेरणी केलेली तारीख नोंदनि करून ठेवावी. पेरणीनंतर ४ ते ७ दिवसात बियाण्याची उगवण झालेली दिसून येते. ४. पिशवीतील किंवा बॉक्समधील बियाणे पेरणीसाठी वापरताना विशेष काळजी घ्यावी. बियाण्याची पिशवी ही नेहमी खालील बाजूने फोडावी, म्हणजे ज्या बाजूला टॅग असेल ती बाजू तशीच व्यवस्थित राहू द्यावी. तसेच बॉक्स असेल तर त्यावरील माहिती सुरक्षित राहील याची काळजी घ्यावी. त्यात बियाण्याचा थोडासा नमुना पिशवीमध्ये किंवा बॉक्समध्ये राखून ठेवावा. म्हणजे बियाणे सदोष आढळल्यास तक्रार केल्यानंतर तपासणी अधिकाऱ्यांना या बियाण्याचा नमुना देता येईल.
बियाणे खरेदी पावती चे महत्व:- टॅग वरील सर्व माहिती वाचून त्याविषयी खात्री झाल्यानंतर शेतकऱ्यांनी विक्रेत्याकडून बियाणे खरेदीची पक्की पावती म्हणजेच बिल घ्यावे. या बिलावर बियाण्याचे पीक आणि वाण तसेच गट क्रमांक, बियाण्याचे खरेदीची तारीख लिहिल्याची खात्री करावी. पुढे जर बियाण्यात काही दोष आढळला तर तक्रार करताना या सर्व गोष्टी उपयोगी पडतात. त्या शिवाय तक्रार ग्राह्य मानली जात नाही. 
बियाणे तक्रार व निवारण:- पेरणीनंतर खुणचिट्ठीवरील प्रमाणापेक्षा उगवण कमी झाल्यास अथवा पिकात फार मोठ्या प्रमाणात भेसळ आढळल्यास बियाणे निरीक्षकाकडे लेखी तक्रार करावी. प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक नियुक्त केलेले आहेत. तसेच कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे शेतकरी तक्रार करू शकतात. बियाणे साधारण ४ ते ७ दिवसात उगवते यासाठी शेतकऱ्यांनी प्रत्येक पीक अवस्थेचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. पेरणीनंतर खुणचिट्ठी प्रमाणा पेक्षा उगवण कमी आढळल्यास नजीकच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कृषी अधिकारी पंचायत समिती याच्याकडे नमुन्याची तपासणी करण्यास तक्रार करावी. तालुका स्तरावर चौकशी समिती असून तक्रारदार शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी करताना शेतकऱ्याने चौकशी समितीस बियांणे बाबातची संपूर्ण माहिती घ्यावी. उदा. खरेदीची पावती, बियाण्याची टॅग, पिशवी इ. द्यावी. बियाण्याची उगवणक्षमता कमी असल्यास संबंधित विक्रेता व बियाणे उत्पादक कंपनी यांच्यावर बियाणे कायदा 1966 मधील कलम 10 नुसार कायदेशीर कारवाई होऊ शकते. 
कायद्यातील तरतुदी:- अधिसूचित जातीचे किंवा प्रकारचे बियाणे पेरणीसाठी वापरल्यास व त्याबाबत शेतकऱ्यांची तक्रार असल्यास त्याबाबत कायद्याच्या तरतुदींप्रमाणे न्याय मागता येतो. चौकशी समिती सर्व बाबींची सखोल तपासणी करून अहवाल देते. बी-बियाणे कायद्यान्वये घोषित केलेल्या दर्जापेक्षा कमी प्रतीचे किंवा आवश्यक तरतुदीचे उल्लंघन झालेले असल्यास व बियाण्यात दोष आढळल्यास संबंधित बियाणे कंपणी आणि विक्रेते याच्याविरुद्ध कारवाई करण्यात येते. तसेच कमी दर्जाच्या बियाणांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असल्यास जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार नोंदवून नुकसान भरपाई मागता येते.

वासु वाकडे
किसानवाणी विभाग
आकाशवाणी, चंद्रपूर 
९८२३५६६०२४

६ टिप्पण्या:

झिंदाबाद!