स्कुल आॕफ स्कालर्स मध्ये महात्मा गांधी १५० व्या जयंती सप्ताह निमित्ताने प्रबोधन

स्कुल आॕफ स्कालर्स मध्ये महात्मा  गांधी १५० व्या जयंती सप्ताह निमित्ताने प्रबोधन

महात्मा गांधी यांचे वैश्विक विचार जगाला तारणारे - बंडोपंत बोढेकर  


गडचिरोली (प्रतिनिधी )-  आजपासून दिडशे वर्षापूर्वी जन्मलेले मोहनदास करमचंद गांधी आपल्या अफाट कर्तुत्वाने महात्मा बनले. स्वातंत्र्य आंदोलनासोबत ग्रामीण जनतेच्या उत्थानाकरीता ते अविरत झटले. सत्याग्रह आणि अहिंसा तर जगात मान्यता पावलेली त्यांची महत्त्वाची  सूत्रे प्रेरक ठरलेली आहे.त्यांच्या विचारांचा मूलगामीपणा आणि व्यापकता यामुळे ते आजही  जगाच्या केंद्रस्थानी ठरले आहे.  सात दशके लोटली तरी   ते विचारांनी  अमर आहे, असे प्रतिपादन ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी येथे केले. 
 स्कुल आॕफ स्कालर्स विद्यालयात शालेय उपक्रम समितीच्या वतीने  आयोजित महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती सप्ताह निमित्ताने ते विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य निखिल तुकदेव होते. विद्यालयाच्या वतीने वृक्षभेट देऊन बंडोपंत बोढेकर यांचे स्वागत केले. याप्रसंगी बोढेकर म्हणाले ,  ह्या देशातील गुलामगीरीची अवस्था पाहून बॕरिस्टर झालेल्या गांधीनी सुटाबुटातील वेषाचा त्याग करून अर्धनग्न पंचावरती आले,  एवढे मोठे परिवर्तन संवेदनशील व्यक्तीमध्येच घडून येऊ शकते. गांधी विचार आजच्या काळासाठी हे पटवून देण्यासाठी अनेक उदाहरणे देत बोढेकर यांनी उत्तम प्रबोधन केले.  प्रास्तविक आणि अतिथी परिचय अमरिष उराडे यांनी करून दिला.  बंडोपंत बोढेकर यांनी स्वलिखित ग्रंथाचा संच ,  इंग्रजी ग्रामगीता ग्रंथ विद्यालयाच्या ग्रंथालयासाठी प्राचार्य तुकदेव आणि ग्रंथपाल सौ. नम्रता खडसे यांना भेट स्वरूपात प्रदान केला . शालेय उपक्रम समितीचे राहुल आंबोरकर , शमषा नाथानी, महेंद्र बोकडे, अपर्णा दरडे, दिलीप खोब्रागडे  आदींनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले. विशेष म्हणजे  गांधी जयंती सप्ताह म्हणून दोन आक्टोबर पर्यंत या विद्यालयात विविध उपक्रमाने  साजरा करण्यात येणार आहे. ह्या कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी तसेच विद्यार्थी वर्गाची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!