पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना कागदोपत्रीच?
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना कागदोपत्रीच ?
लाभार्थी शेतकरी अजूनही प्रतीक्षेत!
मुल ( प्रकाश चलाख)
छोट्या शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देणारी व संपूर्णतः शेतकऱ्यांच्या हितासाठी भारत सरकारतर्फे राबविण्यात येत असलेली "पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना "मुल तालुक्यात कागदोपत्रीच असून सदर योजनेअंतर्गत मिळणारा पहिला हप्ता रुपये 2000 अजूनही लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला नसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांच्या हितासाठी, आर्थिक उन्नतीसाठी दिनांक 1 डिसेंबर 2018 पासून राबविण्यात येत असलेली पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना संपूर्ण भारतभर लागू झाली. या योजनेअंतर्गत छोट्या व सीमांत शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी थेट आर्थिक मदत देण्याचे योजनेत नमूद आहे.
शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये तीन हप्त्यात विभागून देण्याचे ठरले आहे. यातील पहिला हप्ता रुपये 2000 लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केला जाणार आहे. इसवी सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने ही योजना संपूर्ण भारतभर लागू केलेली आहे. ही योजना शेतकऱ्यांच्या हिताची असून सदर योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम डीबीटी द्वारे थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. या योजनेअंतर्गत 12 कोटी शेतकरी लाभान्वित होणार असून या योजनेवर 75000 हजार कोटी रुपये खर्च होणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मूल तालुक्यात एकूण 111 तलाठी साजे असून या कार्यालयांतर्गत येत असलेल्या गावातील प्रत्येक पात्र शेतकऱ्यांनी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी आपली कागदपत्रे संबंधित तलाठी, अधिकारी यांचेकडे सुपूर्द केलेली आहे. परंतु अजूनही तालुक्यातील अनेक लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना अंतर्गत मिळणारा पहिला हप्ता रुपये 2000 जमा झाला नसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
तालुक्यात बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, को-ऑपरेटिव्ह बँक, अॅक्सिस बँक ही प्रमुख बँका असून सदर बँकेत अनेक लाभार्थी शेतकऱ्यांची खाते आहेत .या बँकात अनेक शेतकरी योजने पासून मिळणारा निधी जमा झाला का हे पाहण्यासाठी बँकात येरझारा घालत असल्याचे चित्र आहे. सदर निधीबाबत अनेक बँका समाधान कारक उत्तर देत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे असून याउलट ग्रामीण भागातील बँकांची स्थिती विदारक आहे. एकूणच पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी वाटपात तालुका पिछाडीवर असल्याचे स्पष्ट चित्र आहे.
राज्याचे अर्थमंत्री , पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा मूल तालुका हा निर्वाचन क्षेत्र असून बालेकिल्ला आहे. अनेक विकासाची कामे या तालुक्यात सुरू आहेत. विकासाचा झंझावात तालुक्यात असताना शेतकऱ्यांच्या हितासाठी असणाऱ्या योजनेचा निधीबाबत तालुका पिछाडीवर असल्याने अनेक लाभार्थी शेतकऱ्यांनी आपली नाराजी प्रकट केली असून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी तालुक्यातील सर्व लाभार्थी शेतकरी बांधवांची मागणी आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!