गाडगे महाराज यांनी समाजाला आधुनिकतेची वाट दाखविली - प्रा. पिसे
गाडगे महाराज यांनी समाजाला आधुनिकतेची वाट दाखविली - प्रा. पिसे
- गाडगे महाराज जयंती
चिमूर (प्रतिनीधी)
समाजातील अंधश्रद्धा ,रूढी व परंपरांना झुगारून अंतर्मनासोबतच बाह्यांग व सभोवतालच्या परिसराच्या स्वच्छतेचा ध्यास लावून दिशा दाखविणारे, आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून प्रत्येक्षात समाजाशी नाळ जोडणारे संत म्हणजे गाडगे महाराज ज्यांनी तत्कालीन समाजात चालणारे भेदाभेद याना मूठमाती देऊन समजाला आधुनिकतेची वाट दाखविली. त्यांचा कार्याचा समाज सदैव ऋणी राहील.
ग्रामगिता महाविद्यालय चिमूर येथे गाडगेबाबा जयंती प्रित्यर्थ शनिवार ला आयोजीत कार्यक्रमात प्रा. अरुण पिसे विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. संदीप मेश्राम, प्रमुख मार्गदर्शक प्रा. अरूण पिसे, प्रा. योगेश सोनटक्के आदी उपस्थित होते.
प्रा. योगेश सोनटक्के यांनीही या कार्यक्रमात विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयात जे विध्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांना संत गाडगे महाराज यांचे जीवनचरित्र किती पुरोगामी होते हे अनेक उदाहरणावरून पटवून दिले. विचार प्रत्यक्ष कृतीत उतरविणारे संत म्हणजे गाडगे महाराज होत असे मत त्यांनी मांडले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. संदीप मेश्राम अध्यक्षीय भाषणातुन मार्गदर्शन करताना म्हणाले की गाडगे महाराज हे केवळ संतच नाही तर एक सेवाभावी समाजसुधारकही होते. महाराष्ट्राच्या अनेक समाजसुधारकात त्यांचे कार्य कधीही न विसरण्यासारखे आहे . विद्यार्थी जीवनातच गाडगे महाराजांचे विचार व त्यांनी आपल्या पिढीला दिलेला स्वच्छता संदेशाचा स्विकार विध्यार्थ्यांनी करावयास पाहिजे असा आशावाद व्यक्त केला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाविद्यालयामध्ये विध्यार्थी, प्राध्यापक व सर्व कर्मचारी वृंदानी वर्गखोल्यांची साफसफाई व महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ करून संत गाडगे महाराज यांना आदरांजली वाहिली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मेहमूद पठाण तर आभार प्रदर्शन प्रा. संदिप ठाकरे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविध्यालयाचे कर्मचारी कमलेश दडमल , मुकेश घटे, निखिल भालेराव, मंसाराम घोडमारे व श्रीरामजी खाडे यांचे सहकार्य लाभले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!