रेती तस्करापुढें महसूल प्रशासन नमले?

महसूल प्रशासनाच्या आशिर्वादाने मूल तालुक्यात मोठया प्रमाणावर अवैद्य रेती तस्करी सुरू असून, यामुळे भविष्यात तालुक्यातील नद्यांचे वाटोळे होण्यांची भिती आहे.
दिनांक 8 मार्चच्या रात्री 10 वाजताचे दरम्यान मूलच्या काही युवकांनी अवैद्य रेती वाहतूक करणारे 2  हायवा तहसिल कार्यालयासमोर पकडले.  व ते हायवा तहसिल कार्यालय परिसरात लावले.  विश्वसनीय माहितीनुसार या रेतीची वाहतूक विना टिपी द्वारेच सुरू असल्यांचे समजले. हे वाहन पकडल्यांची माहिती मिळताच, आपण काही कर्मचाऱ्यांना कारवाईसाठी पाठविल्यांची माहिती उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांनी आमचे प्रतिनिधीस सांगीतले. 
रेती तस्करीचे वाहन पकडताच, चंद्रपूरातील बडे रेती तस्करांचे धाबे दणाणले असून, त्यांनी प्रकरण मिटविण्यांकरीता महसूल विभागासोबत असलेल्या आपल्या आर्थिक संबधाचा वापर करणे सुरू केल्यांचे समजते.  वाहन पकडणारे आणि तस्करी करणारे दोनही गट परस्परांना धमक्या देत असल्यांचेही वृत्त आहे.
सुर्यास्तापूर्वी आणि सुर्योदयानंतर रेती उत्खनन करता येत नाही असे असतांना, रात्रौ 10 वाजता मूल वरून रेती भरून हायवा कशा जात होत्या? हायवा सारखे वाहन मजूरांकडून भरणे शक्य नाही, त्यामुळे हे वाहन जेसीबी, पोकलँड वापरूनच भरावे लागतेत्. परवाणगी नसतांना जेसीबी, पोकलँड कसे वापरले जात आहे? मूल शहरात चौकात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लागलेले असतांना, रात्रभर चालणारी रेती तस्करी अधिकाऱ्यांना का दिसत नाही?  असे अनेक प्रश्न या निमीत्ताने निर्माण होत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने, उच्च न्यायालयाने रेती उत्खननाबाबात कठोर आदेश दिल्यांमुळे पर्यावरण विभागाने रेती उत्खननासाठी अनेक जाचक अटी टाकल्या आहेत.  या अटी मुळे रेती कंत्राटदारांना इमानदारीने घाट चालविणे अशक्य असल्यांने, अधिकाऱ्यांना हाताशी धरून, लिलावात रेती घाट घ्यायचे आणि सर्व अटी-शर्ती बाजूला ठेवून रेती उपसा करायचे असा उद्योग सध्या सुरू आहे.
रेती तस्करी रोखा – श्रमिक एल्गारची मागणी
मूल तालुक्यातून रेती कंत्राटदार नियमबाहय पध्दतीने रेती उपसा व वाहतूक करीत असल्यांने, यावर आळा घालावा अशी मागणी श्रमिक एल्गारने आज उपविभागीय अधिकारी यांना निवेदनातून केली आहे.  दिनांक 8 मार्च रोजी रात्रो 10 वाजता श्रमिक एल्गारला मिळालेली रेती तस्करीची माहिती उपविभागीय अधिकारी यांना फोनवरून दिल्यांचे नमुद करीत रेती तस्कर नियमभंग करीत असल्यांचे निवेदनात म्हटले आहे.
मागील वर्षीही मोठया प्रमाणावर रेती तस्करी झाली.  याबाबत श्रमिक एल्गारने स्थानिक पातळीवर व मंत्रालयात पुराव्यासह तक्रार केली होती, विभागीय आयुक्तांनी यावर जिल्हाधिकारी यांना चौकशी करून कारवाई करण्यांचे आदेशही दिले होते.  मात्र रेती तस्करांसोबत या विभागाचे असलेले आर्थिक संबधामुळे या तक्रारीवर कोणतीही कारवाई झाली नाही.  अधिकारी कारवाई करीत नाहीत, त्यामुळे रेती तस्करांची मुजोरी वाढत असल्यांची सामान्य नागरीकांची भावना आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!