श्रध्दांजली!
श्रध्दांजली!
मागील आठवड्यात माझे वडिल श्री. प्रभाकर नानाजी सिध्दावार यांचे निधन झाले. या दुःखद प्रसंगी आमचे पाठीशी उभे राहून धीर देणा—या सर्वांचा मी कुटूंबियातर्फे आभार मानतो!माझे वडिल खूप मोठे व्यक्तीमत्व होते असे नाही, मात्र आलेल्या आयुष्याबद्दल कोणतीही तक्रार नसलेले किंवा आयुष्यातील अपेक्षाबद्दल फार आग्रही व्यक्ती नव्हते.
आम्ही त्यांना ‘दादा’ म्हणत असू. दादांचे सोबती बरेचसे नौकरीला असल्यांने, आणि त्यांच्यापेक्षा दादा जास्त शिकले असल्यांने, दादाना नौकरी का लागली नाही? हा प्रश्न आम्हाला कायम पडायचा. या प्रश्नाचे उत्तर एके दिवशी आईने दिले. दादा शिकत असतांना, चंद्रपूरला वस्तीगृहात राहत होते. वस्तीगृहात राहत असतांना, जेवण बरोबर दिल्या जात नाही, याची तक्रार दादानी संस्थाचालकांकडे केली होती. त्यांनी तक्रार ऐकली नाही. संस्थाचालक मेले, म्हणून मुंडण केले. त्यामुळे, दादा टार्गेटवर आले. त्यावेळी कुणीही संस्थाचालक त्यांना नौकरी दिली नाही आणि खेड्यात नौकरी करणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली, त्यातच नौकरीचा प्रश्न निकाली लागला. दादाच्या आयुष्यात अशी निर्णायक भूमिका घडून त्याचा परिणाम पुढच्या आयुष्यावर पडला असला तरी, दादानी मला किंवा कुणालाही आपल्या मार्गातून बाजूला केले नाही. जे स्विकारले, त्यात मार्गदर्शनाची भूमिकाच त्यांनी स्विकारली. मला आलेले कोर्ट, पोलिस किंवा मान-अपमान यात त्यांनी कधीही ढवळाढवळ केली नाही किंवा कारण, जाब विचारला नाही. उलट मूक राहून माझे कार्याला सतत पाठींबा दिला. वैयक्तीक स्वातंत्र्यांचा खरा अनुभव निश्चितच दादामुळे अनुभवता आला.
दादाचे आयुष्य गरीबी-श्रीमंतीचा खेळ ठरले. बालपणी अतिशय श्रीमंती भोगणा—या दादाना तरूणपणी गरीबीचे चटके बसले. वृध्दोपकाळात मध्यमवर्गीय असल्याचाही अनुभव दादाना आला. या तीनही परिस्थितीत दादाची कोणतीही कुरबूर नव्हती. आपली भेजगावातील वडिलोपार्जीत घर व कित्येक एकराची शेतजमिन दानात दिल्यानंतर आलेल्या गरीबीबाबत त्यांनी कधी खंत व्यक्त केली नाही किंवा पश्चातापही नाही किंवा आपल्या मुलांना त्या संपत्तीचा फायदा होवू शकला असता असा अपराधीपणाचा भावही नाही. त्यामुळेच कधीच त्यांनी कुणाकडूनही कसलीची अपेक्षा व्यक्त केली नसावी हा माझाच अंदाज!
दादानी आम्हाला पैसा, संपत्ती अशी काही दिले नसले तरी, माझे मोठ्या भावाला नौकरी लागावी यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केल्यांचे आठवते. पैश्याअभावी त्यात त्यांना यश आले नाही. गडचिरोलीचे गो.ना.मुनगाटे हे दादाचे वर्गमित्र होते. त्यांचे संस्थेत एकदा बाबूची जागा निघाल्यानंतर, दादा माझे मोठ्या भाऊला त्यांचेकडे मोठ्या आशेने नौकरीसाठी घेवून गेले. तेथून उपेक्षा घेवून परत आले. त्यानंतर, त्यांनी गो.ना. ना चार पानी पत्र लिहून, श्रीकृष्ण-सुदामाचे उदाहरण असलेले पत्र पाठविले, तेव्हा मला ते फार कळले नाही, परंतू आज वाटते, ते पत्र म्हणजे उत्तम साहित्याकृती होती. त्यात अनेक उदाहरणे, कवितेच्या ओळी आणि श्लोकांचा वापरलेले ते अप्रतिम पत्र होते. मुलांसाठी आपण काही करू शकलो नाही याची खंत आणि व्यवहारी जगात शुध्द मैत्री काही स्थान उरले नाही याचे दुःख त्या पत्रात होते.
सतत वाचन करणारे, सतत फिरत राहणारे, सतत लोकांच्या संपर्कात राहणारे, आलेले आयुष्य आनंदाने जगणारे आणि स्वतःचा भार दुस—यावर न टाकणा—या दादांना विनम्र श्रध्दांजली !


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!