ग्रामीण भागातून 'आट्या—पाट्या' व घानमाकड हद्दपार

ग्रामीण भागातून 'आट्या—पाट्या' व घानमाकड हद्दपार 
रंगपंचमीला रासायनिक रंगाचा वापर व पाण्याचा दुरूपयोग 
शंकरपूर (जगदिश पेंदाम): 
      फाल्गुन महिना सुरू होताच होळीची चाहूल लागते. पळसाच्या झाडाला लाल रंगाची फुलं लागायला सुरूवात झाली की ग्रामीण भागात होळी आल्याचा आगाज होतो. आणि होळी साजरी करण्याच्या तयारीला सुरूवात होतो. या तयारीसोबतच खास होळी सणाला खेळल्या जाणा—या खेळाची सुरूवात सुध्दा होते. यात प्रामुख्याने आट्या—पाट्या घानमाकड यांचा समावेश असतो. परंतु आजच्या संगणक व लेटेस्ट मोबाईलवर विविध प्रकारचे खेळ खेळण्यात मग्न असलेल्या मुलांना पारंपारिक खेळाचा विसर पडण्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. यासोबत नैसर्गिक रंगाऐवजी रासायनिक रंगाचा वापर सुध्दा होळी खेळण्यासाठी होत असून यात पाण्याचा अपव्यय होत आहे. त्यामुळे होळी सणादरम्यान होणारा पाण्याचा अपव्यय टाळण्याची गरज आहे. 
       महिनाभरापासूनच होळी सणाच्या तयारीला सुरूवात होते. पुर्वीचे लोक होळीत जाळण्यासाठी शेणापासून तयार करण्यात आलेल्या गोव—या व त्या लाकडापासून मिळणा—या धुरामुळे अपायकारक जंतुचा नायनाट व्हायचा. व धुरामुळे मानवी आरोग्यास कोणत्याच प्रकारची हानी होत नव्हती. हे वैज्ञानिक कारण होते.
     तसेच ग्रामीण  भागातील उत्साही मुले जंगलात जाउन पळसाचे वक्राकार लाकूड आणून त्याची घानमाकड बनवायचे. लाकडाचा ओंडका मधोमध कोरून ठेवले जाते. धनुष्याचा आकाराच्या लाकडावर संतुलन साधत गोल—गोल फिरवले जाते.
      या घानमाकडाच्या कर्कश आवाजात आणि खेळात लहानमुलांपासून मोठ्यांपर्यत सर्वच वयोगटाचे व्यक्ती तल्लीन व्हायचे. घानमाकड लहान मुलांचा तर मोठ्या व्यक्तींचा आट्या—पाट्या हा खेळ सुध्दा ग्रामीण भागात मोठ्या उत्साहाने खेळला जायचा. रस्त्याच्या मधोमध किंवा मोकळ्या जागेवर समान आकाराचे रकाने बनवायचे आणि एका कोप—यापासून दुस—या कोप—यापर्यंत विरोधी टिमला आउट न होता जायचं एका संघातील एक खेळाडू शेवटपर्यंत पोहचला की, दुस—या संघावर एका पाटी बसायची. नंतर दुस—या संघाची पाळी या पध्दतीने आट्या—पाट्यांचा खेळ होळीच्या महिन्याभरापुर्वी पासून सुरू व्हायची. आट्यापाट्या या खेळाला काही भागात 'लोन' असा शब्दप्रयोग सुध्दा करतात. 
     आजच्या परिस्थितीत खेड्यापाड्यांचे शहरीकरण होत आहे. अशातच ग्रामीण भागातील हे खेळ नामशेष झाले आहेत. काळानुरूप बदलत चाललेल्या संस्कृतीमुळे काही व्यक्ती होळीमध्ये टायर जाळून प्रदुषण करतात.
   काही दशकापुर्वी धुलीवंदनासाठी पारंपारिक रंग जसे हळदी पासून तयार केलेला पिवळा रंग व पळसाच्या लाल फुलांपासून लाल रंगाचा वापर केला जायचा या रंगापासून मानवी शरीराला व त्वचेला कोणत्याही प्रकारची हानी होत नव्हती. परंतु अलिकडच्या काळात नैसर्गिक रंगाला तिलांजली मिळाली असून त्याची जागा रासा​यनिक रंगामुळे अनेकांना त्वचेचे विकार जळतात. हा रंग डोळ्यात गेल्यास व्यक्ती आंधळा होउ शकतो.
     अलिकडच्या काळात होळी म्हणजे पाण्याचा खेळ म्हणून याकडे पाहिल्या जाते. काही व्यक्ती तर चक्क दुचाकी, चारचाकी वाहने लावून होळी साजरी करतात. व लाखो लिटर पाण्याची नासाडी होते. सद्यस्थितीत पाण्याची कमतरता असून काही भागात पिण्याच्या बोंबाबोंब सुरू आहे. पाण्याची टॅंक बोलवावी लागत आहे. तर दुसरीकडे होळीच्या नावाने पाण्याचा गैरवापर होतांना दिसून येत आहे. होळीच्या नावावर होणारा पाण्याचा गैरवापर टाळणे काळाची गरज आहे. अन्यथा आज होळी सणामधून घानमाकड व आट्या—पाट्या हद्दपार झाल्या पण येणा—या काळात आपल्या जिवनातून पाणीच हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही. 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!