झाडीबोली साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी बंडोपंत बोढेकर यांची निवड

.भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर येथे डिसेंबर च्या २३ ,२४ व २५ ला होऊ घातलेल्या रौप्य महोत्सवी झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून झाडीबोलीचे साहित्याचे  अभ्यासक ,कवी ,राष्ट्रसंताचे अनुयायी तथा प्रसिद्ध वक्ते ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांच्या नावाची घोषणा नुकतीच वरोरा येथे करण्यात आली. कर्मवीर विद्यालयात आयोजित कवीसंमेलनाचे उद्घाटक म्हणून झाडीबोली चळवळीचे प्रणेते व झाडीबोली साहित्य  मंडळ केंद्रीय समितीचे अध्यक्ष डाँ .हरिश्चंद्र बोरकर प्रकृती अस्वास्थामुळे उपस्थित राहू शकले नाही,या कारणास्तव त्यांच्या वतीने मंडळाचे केंद्रीय उपाध्यक्ष आचार्य ना.गो.थुटे यांनी ही घोषणा केली.तसेच बोढेकर यांचा शाल- श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी शाखाप्रमुख  बापूराव टोंगे,कथाकार मा.तू.खीरटकर,प्राचार्य मदन ठेंगणे,कवी लोकराम शेंडे , वि.नी.डेकाटे आदी साहित्यिक मंडळी उपस्थित होती . ग्रामगीताचार्य बोढेकर गेल्या १५ वर्षांपासून बोली चळवळीत सक्रिय असून  त्यांचा ग्रामगुरू लेखसंग्रह ,खंजेरी झाडीबोली काव्यसंग्रह तसेच नक्षत्राची काव्यबाग ,नक्षत्राची काव्यफुले ही प्रातिनिधीक काव्यसंग्रह प्रकाशित आहे.त्यांच्या खंजेरी काव्यसंग्रहास गजानन बागडे गुरूजी स्मृती झाडीबोली काव्य पुरस्कार तसेच पुण्याचा नक्षत्र काव्य गौरव राज्यस्तरीय पुरस्कार  मिळाला आहे. ते झाडीबोली साहित्य संमेलने,झाडीबोली शाखाविस्तार,शाखापुनर्गठन ,परिसंवाद ,कार्यशाळा तसेच विविध वर्तमानपत्रात समीक्षणात्मक  स्तंभ लेखन आदी कार्यात त्यांनी आजवर विशेष योगदान दिलेले आहे. झाडीबोली चळवळीच्या भविष्याकरिता आता तरूण रक्तांना वाव देण्याचे धोरण समोर ठेवून आपण ही निवड करीत असल्याचे मत मंडळाचे प्रवर्तक डाँ .हरिश्चंद्र बोरकर यांनी व्यक्त केले.तसेच बंडोपंत बोढेकर आणि समवयस्क चमूकडून झाडीबोली चळवळीची वाटचाल अव्याहतपणे सुरू राहिल अशी अपेक्षा व्यक्त केली. बंडोपंत बोढेकर यांची निवड  झाडीबोलीच्या उत्कर्षाकरिता सर्वदृष्टीने योग्य असून त्यांच्या  निवडीबद्दल स्वागताध्यक्ष डाँ .गौरीशंकर टेंभरे ,केंद्रीय समितीचे  हिरामण लांजे ,राम महाजन,डाँ .राजन जयस्वाल , लखनसिंह कटरे,डाँ .गुरूप्रसाद पाकमोडे ,सौ.अंजनाबाई खूणे,होमराज ओक, चंद्रपूर शाखेचे डाँ .प्रा.धनराज खानोरकर ,शिवशंकर घुगूल ,प्रा.डाँ .राज मुसने,मधुकर गराटे आदींनी अभिनंदन केलेले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!