विद्यार्थी शाळेपासून वंचित *१८ सप्टेंबरला युवक कॉंग्रेसचे बसरोको आंदोलन*
विद्यार्थी शाळेपासून वंचित
*१८ सप्टेंबरला युवक कॉंग्रेसचे बसरोको आंदोलन*
गडचांदूर :- राजुरा आगाराच्या अनियोजितपणामुळे कोरपना तालुक्यातील अनेक गावातील विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत पोहचता येत नाही. त्यामुळे माध्यमिक, उच्च माध्यमिकपासून ते पदवीपर्यंत विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. आगार प्रमुखांना वारंवार निवेदने देऊन व चर्चा करून काहीच निष्पन्न होत नसल्याने राजुरा आगाराच्या विरोधात १८ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता गडचांदूर बसस्थानकावर राजुरा विधानसभा युवक कॉंग्रेस बसरोको आंदोलन छेडणार आहे.
गडचांदूर हे कोरपना तालुक्यातील शिक्षणाचे माहेरघर आहे. जिवती तालुक्यातील सुद्धा अनेक विद्यार्थी येथे शिक्षण घेण्यासाठी येतात. मात्र गडचांदूर येथे पोहोचण्यासाठी तालुक्यातील अनेक गावात विद्यार्थ्यांना बसची समस्या भेडसावू लागली आहे. एकही बस वेळेवर नसल्यामुळे मुलांना शाळा शिकवायची कशी या विवंचनेत पालकवर्ग सापडला आहे. कढोली येथील विद्यार्थ्यांचा बस विषयक प्रश्न बिकट आहे. कढोली येथील बस वेळापत्रकाप्रमाणे बरोबर असताना सकाळी वेळेवर येत नसल्याने अकरावी, बारावी व पदवीच्या विद्यार्थ्यांना दोन-तीन तासिकांना मुकावे लागत आहे. निमणी-बाखर्डी येथे तर बस पोहोचतच नाही. अनेक गावांतील विद्यार्थ्यांना गडचांदूर बसस्थानकावर ११.३० ला शाळा सुटल्यानंतर ४-५ वाजेपर्यंत उपाशीपोटी बसची वाट पाहत उभे राहावे लागते. दुपार पाळीतील विद्यार्थी रात्री ९ वाजता घरी पोहचतात.
राजुरा आगाराकडे बसेस उपलब्ध असताना नियोजनाअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. १५-२० मिनिटे वेळ कमी-जास्त केल्यास व बस नसेल त्या ठिकाणी थांबा दिल्यास हि समस्या सुटू शकते मात्र राजुरा आगार प्रमुखाचे चालक व वाहक ऐकत नसल्यामुळे समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या ५ वर्षापासून दरवर्षी निवेदने दिली कि तात्पुरती समस्या सोडवली जाते आणि पुन्हा परिस्थिती जैसे थे होत असल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तालुक्यातील कढोली, निमणी, बाखर्डी, बिबी, लोणी, मांगी, हरदोना, चंदनवाही, जिवती, पाटण कावडगोंदी, वनसडी, नारंडा, वडगाव, खिर्डी, इंजापूर, धामणगाव, कवठाळा अशा अनेक गावांतील विद्यार्थी सकाळ व दुपार पाळीत गडचांदूर येथे शिक्षण घ्यायला येतात. मात्र वेळेवर बस उपलब्ध नसल्याने शाळेपासून वंचित राहावे लागत आहे.
विद्यार्थ्यांची हि समस्या सोडविण्यासाठी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राजुरा विधानसभा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष आशिष देरकर, महासचिव विक्रम येरणे, सागर ठाकुरवार, सतीश बेतावर, उमेश राजूरकर, नितीन बावणे, प्रवीण झाडे, रोशन आस्वले, प्रवीण मेश्राम यांच्या नेतृत्वात बसरोको आंदोलन करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!