धनगर बांधवांना मुख्यमंत्र्यांची ग्वाही

आरक्षणासाठी पुढच्या वर्षी मोर्चाची गरज नाही

नागपूर, ८ डिसेंबर
धनगर बांधवांनो, तुम्ही अनुसूचित जमाती या प्रवर्गात आरक्षणाची मागणी केली आहे. ती मागणी योग्य आहे. मात्र ही आपली अट आज अभ्यास न करता मान्य केली तर विरोधक कोर्टात जातील. परिणामी कोर्ट त्याला स्थगिती देईल. यामुळे आपला हेतू साध्य होणार नाही. याचा विचार करता पूर्ण नियमानुसारच तुम्हाला आरक्षण मिळेल. मी ग्वाही देतो की, पुढच्या वर्षी तुम्हाला आरक्षण मिळावे म्हणून मोर्चा काढण्याची गरज भासणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
अशा आशयाचे संभाषण मोबाईलवरून मोर्चाला संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मोबाईलवरून बोलल्यानंतर काही वेळातच त्यांनी मोर्चेकर्‍यांना रामगिरी या शासकीय बंगल्यावर पाचारण केले. तिथे पद्मश्र्‌री डॉ. विकास महात्मे, डॉ. सुनीता महात्मे, ओमप्रकाश कोठे, रामेश्‍वर पाटील, बापू शिंदे, अरुण नेवरे, दीपक बोराडे, देवेंद्र उगे, डॉ. संदीप धवणे, नारायण मोठेदेसाई, डॉ. तुषार मल्लावार, हरीश खुजे, सुभाष देंडगे, गणेश मंडलिक, मोरेश्‍वर झिले, पंडित मदने, विजय गावडे, अशोक चोरमुले, संतोष महात्मे, रमेश शेंडगे, श्र्‌रीधर मोहोड, नीतेश उगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली.
ही रामगिरीवरील मुख्यमंत्र्याची भेट, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री राम शिंदे यांच्या मध्यस्थीने झाली.
याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, धनगर आणि धनगड या दोन शब्दांवर टाटा रीसर्च सेंटरमध्ये संशोधन सुरू आहे. या दोहोंचा अभ्यासाअंती येणारा निष्कर्ष आपण मांडू. यानंतर आपल्याला आरक्षण मिळावे याकरिता केंद्र शासनाकडे शिफारस केली जाईल.
कुठल्याही स्थितीत युती शासन आपल्याला आरक्षण देण्यासाठी तयार आहे. पण ते धनगर समाजाला मिळालेले आरक्षण प्रत्येक कसोटीवर टिकायला हवे. कुठेही आपण पराभूत होऊ नये अशी सरकारची भूमिका आहे. त्यामुळे आपण थोडी सबुरी ठेवा, यश तुम्हाला नक्कीच मिळेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.