दारूने कोमेजले पंचफुलाचे आयुष्य


पती व मुलगा गमावला - ‘स्वामिनीं’च्या माध्यमातून दारूबंदीसाठी आर्जव



- भाग्यशाली वानखेडे - सकाळ वृत्तसेवा
नागपूर - यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्‍यातील एक-दोन नव्हे, अख्या गावातील महिलांचे आयुष्य दारूमुळे उद्‌ध्वस्त झाले. पंचफुला पेंदोर या महिलेने पतीपाठोपाठ मुलगाही गमावला. दुसरा मुलगा पूर्णपणे दारूच्या आहारी गेल्याने पंचफुलाचे आयुष्य कोमेजले आहे. इतरांच्या वाट्याला हे भोग येऊ नये, यासाठी स्वामिनी संघटनेच्या माध्यमातून ती आता दारूबंदीसाठी झटत आहे.


‘यवतमाळ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा’ अशी ओळख आहे. शैक्षणिक मागसलेपणा, बेरोजगारी, कुमारी मातांच्या समस्यांसोबतच दारूचे व्यसन येथील महिलांना सर्वाधिक छळत आहे. घाटंजीतील इंदिरा वॉर्डातील पंचफुला पेंदोर हिचे पती हमाल म्हणून काम करीत असे. ती शेतमजुरी करते. पतीला दारूच्या आहारी गेल्याने एकटीच्या मिळकतीत घर चालविणे शक्‍य नव्हते. म्हणून मुलांनीही शिक्षण अधर्वट सोडून मोलमजुरी करायला सुरुवात केली. नवऱ्याचे दारू पिणे वाढल्याने शरीरातील अवयव निकामी झाले. चार वर्षांपूर्वी पतीचा मृत्यू झाला.


मोलमजुरीतून पैसा मिळू लागल्याने मुलेही व्यसनी झाली. याच दारूने वयाच्या विसाव्या वर्षीच मोठ्या मुलाचा मृत्यू झाला. लहान मुलगा नितीन गुरांच्या बाजारात काम करतो. त्यालाही दारूचे व्यसन जडल्याने पंचफुला हतबल झाली आहे. त्याने आता सर्व सीमा ओलांडल्या आहेत. पैसे जवळ नसले की तो पंचफुलाच्या जवळचे पैसे हिसकावतो. कधी मारहाणसुद्धा करतो. बायको आल्यावर सुधरेल, या आशेने तिने त्याचे लग्न करून दिले. मात्र, त्याच्यात कुठलाच फरक पडला नाही. उलट दोनच महिन्यांत त्याने बायकोला हाकलून दिले. मुलाच्या व्यसनामुळे तिला आता घरी राहण्याचीही भीती वाटत आहे. यामुळे ती आता महेश पवार यांच्या दारूबंदीच्या स्वामिनी अभियानात सहभागी झाली आहे.


दारूमुळे संपूर्ण आयुष्य दबाव आणि भीतीत घालवले. कधीही काय होईल, याची काहीच शाश्‍वती नव्हती. पती आणि मुलाला गमावले. आयुष्याची झालेली परवड आजही सुरूच आहे. फरक एवढाच नवऱ्याची जागा आता मुलाने घेतली. आपण जे भोगले ते भोग इतरांच्या वाट्याला येऊ नये हीच इच्छा आहे. याकरिता स्वामिनीच्या दारूबंदी अभियानात सहभागी झाले.
- पंचफुला पेंदोर