बारावी पुरवणी परीक्षेचा आज निकाल
नागपूर - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे २९ सप्टेंबर ते २१ ऑक्टोबर दरम्यान घेण्यात आलेल्या बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल मंगळवार, २७ रोजी दुपारी १ वाजता www.mahresult.nic.in संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.
या सर्व विद्यार्थांच्या गुणपत्रिका विभागीय मंडळाच्या वतीने २० नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता विद्यालयांना पाठवण्यात येणार आहे. दुपारी ३ वाजता विद्यार्थ्यांसाठी गुणपत्रिकेचे वाटप सुरू करण्यात येईल. २०१३ पासून विभागाने फेरमूल्यांकनाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.ज्या विद्यार्थ्यांना गुणांची पडताळणी करायची आहे, त्यांनी २१ ते ३० नोव्हेंबरदरम्यान शुल्क भरून अर्ज सादर करायचा आहे. अर्जासोबत मूळ गुणपत्रिकेची प्रत जोडावी. याशिवाय ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत प्राप्त करायची आहे, त्यांनी ऑनलाईन निकालानंतर बुधवारी विहित शुल्कासह ७ डिसेंबरपर्यत अर्ज करावा. त्यासाठी छायांकित प्रत मिळाल्याच्या पाच दिवसांपर्यत फेरमूल्यांकनासाठी अर्ज करणे अनिवार्य करण्यात आले आहे. याशिवाय ज्यांना फेब्रुवारी-मार्च २०१६ बसायचे आहे, त्यांनी दिलेल्या अटीमध्ये अर्ज करावा. अधिक माहितीसाठी विभागीय मंडळाद्वारे हेल्पलाईन क्र. ०७१२-२५६०२०९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.

