टाकाऊ साहित्यातून साकारले कल्पक आकाशकंदील; पोस्टकार्डवरील शुभेच्छांनी पत्रलेखन संस्कृतीला उजाळा!
सावित्रीबाई फुले विद्यालयात पर्यावरणपूरक आकाशकंदील निर्मिती व दिवाळी शुभेच्छा संदेश लेखन उपक्रम उत्साहात
तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - दिवाळीचा सण म्हणजे आनंद, उत्साह आणि सर्जनशीलतेची पर्वणी! याच सणाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा, पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी तसेच आधुनिक डिजिटल युगात हरवत चाललेल्या पत्रलेखन संस्कृतीचे जतन व्हावे, या उद्देशाने सावित्रीबाई फुले विद्यालय, पवनी येथे पर्यावरणपूरक आकाशकंदील निर्मिती आणि दिवाळी शुभेच्छा संदेश लेखन असे दोन अभिनव उपक्रम उत्साहात राबविण्यात आले.
या उपक्रमांतर्गत आयोजित आकाशकंदील निर्मिती स्पर्धेत इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी टाकाऊ व उपलब्ध साहित्याचा कल्पकतेने पुनर्वापर करीत विविध आकारांचे, रंगीबेरंगी आणि आकर्षक आकाशकंदील तयार केले. आपल्या कल्पनाशक्तीला कलात्मकतेची जोड देत विद्यार्थ्यांनी साकारलेल्या या आकाशकंदिलांमधून सर्जनशीलतेसोबतच पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा संदेशही दिला. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलाकृतींचे विद्यालयाच्या प्रांगणात आकर्षक प्रदर्शन मांडण्यात आले. उत्कृष्ट आकाशकंदिलांची निवड करून विजेत्या विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्टीनंतर पारितोषिके देण्यात येणार आहेत.
दरम्यान, मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे मागे पडत चाललेल्या पत्रलेखनाच्या सवयीला पुन्हा प्रोत्साहन देण्यासाठी विद्यालयातर्फे विद्यार्थ्यांना पोस्टकार्ड वितरित करण्यात आले. या पोस्टकार्डवर विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा संदेशांचे लेखन करून त्यांची आकर्षक सजावट करायची आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे लेखनकौशल्य, विचारांची अभिव्यक्ती आणि सर्जनशीलता विकसित होण्यासोबतच आपुलकीने शुभेच्छा व्यक्त करण्याची पारंपरिक संस्कृतीही जपली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेली शुभेच्छापत्रे दिवाळीच्या सुट्टीनंतर विद्यालयात सादर करावयाची असून उत्कृष्ट कार्डांची निवड करून विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.
या दोन्ही उपक्रमांचे आयोजन मुख्याध्यापिका सुजाता गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी विज्ञान शिक्षिका स्मिता मोहरकर यांनी विद्यालयाच्या प्रांगणात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी सुंदर व आकर्षक रांगोळी साकारून उपक्रमाच्या वातावरणात अधिक रंगत आणली.
या उपक्रमांच्या यशस्वितेसाठी राज्य पुरस्कृत शिक्षक अशोक गिरी, संदीप मुंडले, ललिता डेकाटे, अरुणा कांबळे, प्रतीक रंगारी, अर्चना दडवे, सुमय्या शेख, प्रतिभा रामटेके व प्रिया शेंडे यांनी सहकार्य केले.
कला, पर्यावरण संवर्धन आणि संस्कृती यांचा सुरेख संगम घडविणाऱ्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ कलाकृती तयार करण्याची संधी मिळाली नाही, तर पुनर्वापराचे महत्त्व, पर्यावरणाप्रती जबाबदारी, लेखनाची आवड आणि पारंपरिक मूल्यांची जपणूक यांचेही महत्त्व पटवून देण्यात आले. आनंददायी व कृतीशील शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याचा आदर्श सावित्रीबाई फुले विद्यालयाने या उपक्रमातून घालून दिला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!