निष्टी शाळेत दिवाळीचा सर्जनशील जल्लोष! विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून साकारल्या आकर्षक कलाकृती
कला व कार्यानुभव उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; पणत्या, आकाशकंदील, रांगोळी अन् शुभेच्छापत्रांतून विद्यार्थ्यांनी दाखविले कलाकौशल्य
तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - दिवाळीचा सण म्हणजे आनंद, उत्साह आणि सर्जनशीलतेची पर्वणी. याच सणाचे औचित्य साधून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, निष्टी येथे 'कला व कार्यानुभव' या विषयांतर्गत विद्यार्थ्यांसाठी विशेष दिवाळी उपक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव देणाऱ्या या उपक्रमातून शाळेत कलात्मक आणि आनंददायी वातावरण निर्माण झाले.
विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देणे, कल्पनाशक्ती विकसित करणे, श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व पटवून देणे तसेच स्वावलंबन आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीची जाणीव निर्माण करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवित आपल्या कल्पनाशक्तीला कलात्मक रूप दिले. विद्यार्थ्यांनी आकर्षक पणत्या रंगविणे, विविध रंगांचे आकाशकंदील तयार करणे, सुंदर रांगोळी रेखाटणे, पर्यावरणपूरक सजावटीच्या वस्तू बनविणे तसेच रंगीबेरंगी शुभेच्छापत्रे तयार करण्याचे कौशल्य दाखविले. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी साकारलेल्या या कलाकृतींमधून त्यांची कल्पकता, कलात्मकता आणि सर्जनशीलतेचे दर्शन घडले.
विशेष म्हणजे, केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याचा आनंद विद्यार्थ्यांना या उपक्रमातून अनुभवता आला. स्वतः तयार केलेल्या वस्तूंचा आनंद आणि समाधान विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होते. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या आकर्षक कलाकृतींचे शिक्षक व पालकांनी विशेष कौतुक केले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक अंकुश कामडी यांच्या मार्गदर्शनाखाली पदवीधर शिक्षक श्रीकृष्ण हाडगे, शिक्षिका लीना काटेखाये, सहशिक्षक सत्यवान बावनगडे, शिक्षण सेविका रूपाली वांढरे आणि अर्चना आरसोडे यांनी मोलाचे सहकार्य केले.
शालेय शिक्षणासोबतच कला, कार्यानुभव आणि प्रत्यक्ष कृतीला महत्त्व दिल्यास विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधता येतो, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सहकार्याची भावना, श्रमसंस्कृती आणि स्वावलंबनाचे संस्कार रुजण्यास मदत होत असून, शिक्षण अधिक आनंददायी व कृतीशील बनत असल्याचे चित्र निष्टी शाळेतील या दिवाळी उपक्रमातून पाहायला मिळाले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!