वनविभागाची एकजूट; चारगाव नदीवर वनराई बंधाऱ्याची उभारणी!
सावली वनपरिक्षेत्रात अवघ्या १५ दिवसांत १०० वनराई बंधारे पूर्ण; पाचही उपक्षेत्रांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन सावली वनपरिक्षेत्रात वनविभागाच्या वतीने व्यापक जलसंधारण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत ६ नोव्हेंबर रोजी चारगाव नदीवर वाळूच्या पोत्यांच्या सहाय्याने मोठ्या वनराई बंधाऱ्याची उभारणी करण्यात आली. वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकजुटीने श्रमदान करून जलसंधारणाच्या कार्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
विभागीय वन अधिकारी राजन तलमले आणि सहाय्यक वनसंरक्षक विकास तरसे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे. नदीपात्रात वनराई बंधारे उभारल्यामुळे वाहून जाणारे पावसाचे पाणी अडवून स्थानिक पातळीवर पाणीसाठा निर्माण होण्यास मदत होणार आहे. या पाण्याचा उपयोग वन्यप्राणी व पक्ष्यांना पिण्यासाठी होण्यासोबतच भूजल पुनर्भरणालाही हातभार लागणार आहे.
१५ दिवसांत १०० वनराई बंधाऱ्यांची उभारणी
या मोहिमेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे सावली वनपरिक्षेत्रातील प्रत्येक बीटमध्ये किमान पाच वनराई बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी वनविभागाने वेगाने काम करत अवघ्या १५ दिवसांत संपूर्ण वनपरिक्षेत्रात एकूण १०० वनराई बंधारे उभारले आहेत. या माध्यमातून वनक्षेत्रातील पाण्याची उपलब्धता वाढविणे, पावसाचे पाणी अडविणे आणि जमिनीत पाणी मुरविणे यावर विशेष भर देण्यात येत आहे.
वनक्षेत्रात पाण्याचे स्रोत उपलब्ध झाल्यास वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी जंगलाबाहेर जाण्याची गरज कमी होऊ शकते. परिणामी मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या प्रयत्नांनाही या उपक्रमामुळे बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
पाचही उपक्षेत्रांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची एकजूट
चारगाव नदीवरील वनराई बंधारा उभारणीच्या कामात सावली, पेंढरी, पाथरी, व्याहाड आणि राजोली या पाचही उपक्षेत्रांतील क्षेत्र सहाय्यक, वनपाल, वनरक्षक, बीट मदतनीस, PRT पथक तसेच वनमजुरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून हा उपक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला.
उपक्रमात सहभागी अधिकारी व कर्मचारी पुढीलप्रमाणे :
उपक्षेत्र सावली : एन. एल. सिडाम (क्षेत्र सहाय्यक), एम. व्ही. मुंडे (वनरक्षक सादागड), ए. ए. गित्ते (वनरक्षक टेकाडी), आर. आर. मुरकुटे (वनरक्षक चकपरंजी), रोशन मडावी, दिनेश मडावी, नवनीत जराते, पुणेश्वर भोयर, PRT राकेश गुंडावार, नागेश बद्दमवार, राकेश घोटेकर, शुभम देशमुख, अनिकेत जराते, अभिषेक भोयर, नितीन भोयर, वैभव गोहणे, समीर गोहणे व रितेश गोहणे.
उपक्षेत्र पेंढरी : ए. एन. मेश्राम (वनपाल), डी. एल. गुरनुले (वनरक्षक पेंढरी), आखाडे (वनरक्षक चारगाव), मिथुन पेंदाम (बीट मदतनीस पेंढरी), नागनाथ नर्मलवार (बीट मदतनीस चारगाव), विनोद जेंगठे (बीट मदतनीस मुंडाळा) तसेच चारगाव PRT पथक.
उपक्षेत्र पाथरी : एम. जे. मस्के (क्षेत्र सहाय्यक), एस. टी. चुधरी (वनरक्षक पालेबारसा), एम. पी. इंगले (वनरक्षक गेवरा), के. पी. मुनघाटे (वनरक्षक पाथरी), द्रोणाचार्य लोनबले, राजेंद्र गेडेकर, विनोद वाघरे, विनायक भादे, सूरज कोटगले, टेकाजी वाढणकर, शामराव चौधरी व जगदीश मेश्राम.
उपक्षेत्र व्याहाड : एम. व्ही. पुल्लेवाड (क्षेत्र सहाय्यक), राजेंद्र डांगे (वनरक्षक उपरी), अक्षय मेश्राम (वनरक्षक गायडोंगरी), दिलीप शेडमाके (वनरक्षक सामदा), एकनाथ खुडे (वनरक्षक नवेगाव), गजानन पिपरे, रविंद्र रोहनकर, अनिल भोयर व विलास चुधरी (बीट मदतनीस).
उपक्षेत्र राजोली : ए. बी. शेळकि (क्षेत्र सहाय्यक राजोली), एस. जे. आदे (वनरक्षक राजोली), एस. ए. नागोसे (वनरक्षक चितेगाव), एन. वाय. बोरकर (वनरक्षक गोलाभूज), रामभाऊ कडस्कर (क्षेत्र सहाय्यक मदतनीस), सूरज मारभते, समीर बावणे व विशाल कन्नाके.
‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची जोड देत सावली वनपरिक्षेत्रातील वनकर्मचाऱ्यांनी दाखविलेली एकजूट निश्चितच कौतुकास्पद आहे. केवळ वनसंवर्धनच नव्हे, तर वन्यजीवांचे संरक्षण आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्याच्या दृष्टीनेही हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. वनविभागाच्या या सामूहिक प्रयत्नांतून पर्यावरण संवर्धनाप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित झाली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!