आरोपी गजानन गुळधे यांना आठ दिवसांनंतर अटक; काँग्रेसचा १३ नोव्हेंबरचा मोर्चा रद्द!

सातारा येथील अल्पवयीन मुलीवरील कथित लैंगिक अत्याचार प्रकरणाला नवे वळण; पोलिसांच्या कारवाईनंतर आंदोलन मागे

शहर - प्रतिनिधी ( चंदू मडकवार )

चिमूर : - चिमूर तालुक्यातील सातारा येथील अल्पवयीन मुलीवरील कथित लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी तथा सातारा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच गजानन गुळधे यांना अखेर आठ दिवसांनंतर पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवार, दिनांक १२ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी सुमारे ६ वाजताच्या दरम्यान सातारा येथील त्यांच्या राहत्या घरातून चिमूर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीला अटक झाल्यामुळे शुक्रवार, १३ नोव्हेंबर रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला मोर्चा रद्द करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, ४ नोव्हेंबर २०२६ रोजी या प्रकरणी चिमूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी गजानन गुळधे फरार झाल्याचे सांगण्यात येत होते. त्यानंतर चिमूर पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली होती. मात्र, दिवसामागून दिवस उलटत असतानाही आरोपी पोलिसांच्या हाती लागत नसल्याने या प्रकरणाची चर्चा संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात सुरू झाली होती.
दरम्यान, आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी तालुका काँग्रेस व युवक काँग्रेसच्या वतीने चिमूर पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. तसेच १३ नोव्हेंबर रोजी काँग्रेस पक्षाच्या वतीने मोठा मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली होती.

या प्रकरणाला राजकीय वळणही मिळाले होते. आरोपीला वाड्यावर लपवून ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाल्याचा दावा करीत शिवानी वडेट्टीवार यांनी ४ नोव्हेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत आरोप केले होते. मात्र, आमदार किर्तीकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडिया यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. आरोपीचा भाजपच्या स्थानिक संघटनात्मक पदाशी संबंध असल्याच्या चर्चेमुळेही जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले होते.

अखेर १२ नोव्हेंबर रोजी सकाळी पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहिती समोर आल्यानंतर काँग्रेस पक्षाने १३ नोव्हेंबर रोजी नियोजित केलेला मोर्चा रद्द करण्याचा निर्णय घेतला. आरोपीला अटक झाल्याची माहिती काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष विजू पाटील गावंडे यांनी दिली.यावेळी चंद्रपूर जिल्हा महासचिव गजानन बुटके, विजु पाटील गावंडे काँग्रेस  तालुका अध्यक्ष चिमूर, जुनेद खान, प्रशांत डवले, राजु लोणारे, नागेश चट्टे,बब्बु खान, संदीप कावरे, शांताराम शेलवटकर, इरफान खान, मासुरकर, रोहन नन्नावरे आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

आता या प्रकरणाचा पुढील तपास, न्यायालयीन प्रक्रिया आणि पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी पोलिसांकडून कोणती पावले उचलली जातात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!