माता महाकालीच्या दर्शनासाठी निघालेल्या ९ वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला…




चंद्रपूर- नवरात्र महोत्सवात चंद्रपूर येथील माता महाकाली दर्शनाला मोठ्या प्रमाणात भाविक पायी यात्रा करून चंद्रपूरला पोहचतात.अनेक वर्षापासून ही प्रथा सुरू असून ,या नवरात्रोत्सवा दरम्यान बल्लारपूर – महामार्ग रात्रीही गजबजलेला असतो.दरम्यान याच महामार्गावर विसापूर टोलनाक्याजवळ माता महाकालीच्या दर्शनासाठी आपल्या शेजारी नातेवाईकांसोबत पायी जाणाऱ्या एका ९ वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला केला. ही घटना शनिवारी (१७ ऑक्टोबर) रात्री ११ च्या सुमारास घडली.

नवरात्रोत्सवा निमित्त बल्लारपूरहून चंद्रपूर येथील माता महाकालीच्या दर्शनासाठी भाविक पायी जात होते. रात्री ११ वाजताच्या सुमारास विसापूर टोलनाक्याजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक भाविकांच्या गर्दीतील एका चिमुरड्यावर झडप घातली आणि त्याला ओढत जवळच्या झुडपात नेले.जखमी झालेल्या ९ वर्षीय मुलाचे नाव कार्तिक संजय जाधव आहे. तो मूळचा हैदराबादचा रहिवासी असून बल्लारपूर येथे आपल्या आत्याकडे आला होता आणि कुटुंबीयांसह दर्शनासाठी निघाला होता.

बिबट्याचा हल्ला आणि थरार…
बिबट्याने कार्तिकला जबड्यात पकडून बॉटनिकल गार्डनच्या उंच भिंतीवरून आत ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, सोबतच्या लोकांनी आणि इतर भाविकांनी तात्काळ मोठमोठ्याने आरडाओरडा सुरू केल्यामुळे बिबट्या घाबरला आणि मुलाला सोडून जंगलात पळून गेला.

घाबरून न जाता कार्तिक ने दाखवले प्रसंगावधान: बिबट्याच्या हल्ल्यामुळे कार्तिकच्या मानेला व गळ्याला गंभीर दुखापत झाली होती आणि त्याला ओरडताही येत नव्हते. मात्र, अत्यंत बिकट परिस्थितीतही त्याने धीर सोडला नाही. झुडपांमध्ये जखमी अवस्थेत पडून असताना त्याने सतत टाळ्या वाजवून आपली उपस्थिती जाणवून दिली.

शोधमोहीम आणि बचाव: घटनेनंतर पोलीस, वनविभाग आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. सुमारे दीड ते दोन तासांच्या शोधानंतर, कार्तिकने वाजवलेल्या टाळ्यांच्या आवाजाचा मागोवा घेत शोध पथक त्याच्यापर्यंत पोहोचले आणि बॉटनिकल गार्डनच्या भिंतीजवळून त्याची सुखरूप सुटका करण्यात आली.

कार्तिकच्या गळ्यावर आणि मानेवर गंभीर जखमा झाल्या आहेत. त्याला तात्काळ चंद्रपूरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वनविभागाने या परिसरात बिबट्याचा माग काढण्यासाठी कॅमेरा ट्रॅप लावले आहेत.
या मार्गावरून रात्रीच्या वेळी प्रवास करत असल्यास अत्यंत सावधगिरी बाळगावी आणि एकटे न चालता समूहाने प्रवास करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!