पब्लिक पंचनामा इफेक्ट! गांधी चौकातील अनधिकृत लोखंडी संरचनेला नगरपरिषदेची नोटीस

पब्लिक पंचनामा इफेक्ट! गांधी चौकातील अनधिकृत लोखंडी संरचनेला नगरपरिषदेची नोटीस

मंडळाचे पदाधिकारी अनुपस्थित; नोटीस थेट लोखंडी संरचनेवर चिपकवली, स्वतःहून न हटविल्यास कारवाईचा इशारा!

मूल : प्रतिनिधी

मूल शहरातील गांधी चौकात मुख्य रस्त्यालगत उभारण्यात आलेल्या लोखंडी चौकोनी संरचनेचा मुद्दा पब्लिक पंचनामाने बातमीच्या माध्यमातून उपस्थित केल्यानंतर नगरपरिषद प्रशासनाने संबंधित मंडळाला नोटीस बजावली आहे. याबाबत नगराध्यक्ष एकता समर्थ यांनी मुख्याधिकारी यांना लेखी पत्र देऊन कारवाईची मागणी केली होती.  विशेष म्हणजे, नगरपरिषदेच्या नोटिशीत पब्लिक पंचनामामध्ये प्रकाशित झालेल्या बातमीचा संदर्भ देण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाची प्रशासनाने दखल घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

आचारसंहितेच्या काळात गांधी चौकातील मुख्य रस्त्यालगत ही लोखंडी संरचना उभारण्यात आल्याने तिच्या उभारणीसाठी आवश्यक परवानगी घेण्यात आली होती काय, असा प्रश्न उपस्थित झाला होता. सार्वजनिक रस्त्यावरील जागेवर अशा प्रकारची संरचना उभारण्यास नगरपरिषदेची पूर्वपरवानगी आवश्यक असताना संबंधितांनी नियमांचे पालन केले होते काय, याची चौकशी करण्याची मागणीही पुढे आली होती.

नगरपरिषदेच्या नोटिशीत काय?

नगरपरिषद मूलच्या स्वच्छता निरीक्षकांनी २४ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी केलेल्या नोटिशीत गांधी चौकातील मुख्य रस्त्यालगत उभारण्यात आलेल्या लोखंडी संरचनेचा उल्लेख केला आहे. नोटिशीत नगराध्यक्ष एकता समर्थ यांचे पत्राचा, पब्लिक पंचनामामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीचा संदर्भ देत संबंधित मंडळाला ही उभारणी तात्काळ काढून टाकण्यास सांगण्यात आले आहे.

नोटिशीत सार्वजनिक रस्त्यावरील अनधिकृत उभारणी, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आणि वाहतुकीतील संभाव्य अडथळे याबाबत मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. संबंधितांनी स्वतःहून ही संरचना न हटविल्यास नगरपरिषद प्रशासनाकडून ती हटविण्याची कारवाई केली जाऊ शकते, असे नोटिशीत नमूद आहे. तसेच, संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार पुढील कारवाई करण्याबाबतही प्रशासनाने भूमिका स्पष्ट केली आहे.

गांधी चौकात फायर शोच्या आयोजनाचाही संदर्भ नोटिशीत देण्यात आला असून, गर्दीच्या ठिकाणी अशा उभारणीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

पदाधिकारी नोटीस घेण्यासाठी आले नाहीत; संरचनेवरच नोटीस चिपकवली!

नगरपरिषद प्रशासनाने संबंधित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, पदाधिकारी नोटीस स्वीकारण्यासाठी उपस्थित न झाल्याने प्रशासनाने नोटीस थेट संबंधित लोखंडी संरचनेवर चिपकवली. त्यामुळे या प्रकरणात नगरपरिषद प्रशासनाने अधिकृत पातळीवर दखल घेतल्याचे दिसून येत आहे.

आता लोखंडी संरचना हटणार की पुढील कारवाई होणार?

पब्लिक पंचनामाच्या बातमीतून उपस्थित झालेल्या प्रश्नांची नगरपरिषद प्रशासनाने दखल घेतल्याने या प्रकरणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. संबंधित मंडळ ही संरचना स्वतःहून हटविणार काय, अन्यथा नगरपरिषद प्रशासन प्रत्यक्ष कारवाई करणार काय, तसेच परवानगीसंदर्भातील नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई होणार काय, याकडे मूल शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

बातमीचा संदर्भ थेट नगरपरिषदेच्या नोटिशीत आल्याने ‘पब्लिक पंचनामा इफेक्ट’ची चर्चा सुरू झाली आहे. आता गांधी चौकातील लोखंडी संरचनेबाबत नगरपरिषद प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!