मासिक पाळीविषयी संकोच नको; आरोग्याची काळजी घ्या!

निष्टी शाळेत विद्यार्थिनींना मासिक पाळी व वैयक्तिक स्वच्छतेबाबत मार्गदर्शन

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - दि. ९ ऑक्टोबर २०२६ : किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीविषयी जागरूकता निर्माण व्हावी, या नैसर्गिक शारीरिक प्रक्रियेबाबत असलेले गैरसमज दूर व्हावेत आणि विद्यार्थिनींनी वैयक्तिक स्वच्छतेसह आपल्या आरोग्याची योग्य काळजी घ्यावी, या उद्देशाने जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा, निष्टी येथे इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थिनींसाठी ‘मासिक पाळी व वैयक्तिक स्वच्छता’ या विषयावर जनजागृतीपर मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका लीना काटेखाये होत्या, तर प्रमुख पाहुण्या म्हणून निष्टी येथील आशा वर्कर सुनीता पालांदूरकर उपस्थित होत्या.

यावेळी सुनीता पालांदूरकर, लीना काटेखाये, रूपाली वांढरे आणि अर्चना आरसोडे यांनी विद्यार्थिनींना मासिक पाळी या नैसर्गिक शारीरिक प्रक्रियेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. मासिक पाळीच्या काळात वैयक्तिक स्वच्छता कशी राखावी, सॅनिटरी पॅडचा योग्य वापर कसा करावा, वापरलेल्या पॅडची सुरक्षित विल्हेवाट कशी लावावी, तसेच पौष्टिक आहार आणि आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली.

मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया; गैरसमज दूर करण्याची गरज!

समाजात आजही मासिक पाळीविषयी अनेक गैरसमज आणि संकोचाची भावना आढळते. त्यामुळे किशोरवयीन मुलींना योग्य व शास्त्रीय माहिती मिळणे आवश्यक आहे. मासिक पाळीच्या काळात स्वच्छतेकडे दुर्लक्ष न करता आरोग्याची काळजी घ्यावी, कोणतीही शारीरिक समस्या जाणवल्यास विश्वासू पालक, शिक्षिका किंवा आरोग्य कर्मचाऱ्यांशी मोकळेपणाने संवाद साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

विद्यार्थिनींच्या वयात होणारे शारीरिक बदल समजून घेणे, त्याविषयी मनात कोणताही न्यूनगंड न बाळगणे आणि आरोग्यदायी सवयी अंगीकारणे महत्त्वाचे असल्याचेही मार्गदर्शनातून स्पष्ट करण्यात आले.

विद्यार्थिनींमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण

शालेय स्तरावर अशा प्रकारच्या जनजागृतीपर उपक्रमांमुळे विद्यार्थिनींना आरोग्यविषयक योग्य माहिती मिळण्यास मदत होते. मासिक पाळीविषयी मनातील भीती व संकोच दूर करून स्वच्छतेच्या चांगल्या सवयी विकसित करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली वांढरे यांनी केले, तर अर्चना आरसोडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!