महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोकअदालत अभियान’ राबविणार

महसुली प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्याची संधी

‘महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोकअदालत अभियान’ राबविणार


मूल : महसूल प्रशासनातील प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणे जलदगतीने आणि दोन्ही पक्षांच्या सहमतीने तडजोडीद्वारे निकाली काढण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ‘महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोकअदालत अभियान’ राबविण्यात येत आहे. हे अभियान १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

या अभियानांतर्गत मूल तहसील कार्यालयात १२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विशेष लोकअदालत आयोजित करण्यात आली आहे. महसूल विभागातील प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणांचा जलदगतीने तडजोडीने निपटारा करण्यासाठी ही मोहीम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या अभियानात प्रलंबित अर्धन्यायिक प्रकरणे आपसी तडजोडीने व सहमतीने निकाली काढणे, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते, शिव रस्ते तसेच अतिक्रमित रस्ते मोकळे करणे आणि कलम ८५ अन्वये आपसी वाटणीपत्राची प्रकरणे निकाली काढणे यांचा समावेश आहे.

प्रलंबित महसुली दावा असलेल्या दोन्ही पक्षकारांनी अथवा त्यांच्या वकिलामार्फत निर्धारित नमुन्यात तडजोडीसाठी अर्ज साद करावा. प्राप्त अर्जांची छाननी करून दोन्ही पक्षांची संमती निश्चित केली जाईल. त्यानंतर कायदेशीर तडजोडनामा घेऊन लोकअदालतीच्या दिवशी दोन्ही पक्षांच्या सहमतीने अंतिम आदेश पारित करून प्रकरण कायमस्वरूपी निकाली काढण्यात येणार आहे.

अभियानाची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पंचायत समिती, ग्रामपंचायत, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व पोलीस पाटील यांच्या माध्यमातून गावागावांत दवंडी तसेच लाऊडस्पीकरद्वारे प्रचार-प्रसिद्धी करण्यात आली आहे.

मूल तालुक्यातील नागरिकांनी आपल्या प्रकरणाशी संबंधित सर्व आवश्यक कागदपत्रांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार मुदुला मोरे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!