संविधान वाचविण्यासाठी जनतेने आवाज उठवावा; शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या — आ. विजय वडेट्टीवार

धान बोनस, पीकविमा, प्रोत्साहन रक्कम व सिंचनाच्या प्रश्नांवर काँग्रेसचा चिमुरात जनआक्रोश महामोर्चा; हजारो शेतकरी सहभागी

उप संपादक 
विलास मोहिणकर 

चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून सोयाबीन व कापूस या प्रमुख पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी तसेच विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी चिमूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने १८ सप्टेंबर रोजी जनआक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या महामोर्चात शेकडो बैलगाड्या, ट्रॅक्टर तसेच हजारो शेतकरी सहभागी झाले होते.
पंचायत समिती चिमूर परिसरातून दुपारी १ वाजता महामोर्चाला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करीत हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. यानंतर मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. तहसील कार्यालयासमोर उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी सरकारविरोधात आवाज उठविला.
यावेळी आमदार विजय वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना चिमूर तालुक्यातील सिंचनाच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधले. गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी अद्याप या भागातील शेतकऱ्यांना अपेक्षित प्रमाणात मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले. मोखाबर्डीचे पाणी तसेच बालाजी सागर प्रकल्पाच्या स्थितीबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर या भागातील लोकप्रतिनिधींनी विधानसभेत ठोस आवाज उठविण्याची गरज असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. सरकारकडून दिलेली आश्वासने पूर्ण होत नसल्याचा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, धानाला बोनस, पीकविमा तसेच प्रोत्साहन रक्कम मिळावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी वडेट्टीवार यांनी संविधान आणि आरक्षणाच्या प्रश्नावरही भाष्य केले. एससी-एसटी आरक्षणाच्या संरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत संविधानाच्या संरक्षणासाठी राहुल गांधी संसदेत आवाज उठवत असल्याचे त्यांनी सांगितले. पेपरफुटी तसेच युवकांच्या प्रश्नांवरही आवाज उठविण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
“चिमूर जिल्हा करू” या आश्वासनाची आठवण करून देत त्यांनी चिमूर जिल्ह्याच्या मागणीवरही भाष्य केले. सत्ता राज्यात आणि केंद्रात असताना चिमूर जिल्ह्याचा प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याचे त्यांनी नमूद केले.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. पीकविमा, कर्जमाफी, धान बोनस, सिंचनाचे पाणी आणि शेतमालाला योग्य मोबदला या प्रमुख मागण्या शेतकऱ्यांनी मांडल्या.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या शिवानी वडेट्टीवार यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. चिमूर विधानसभा क्षेत्रात सिंचनाच्या पुरेशा सुविधा नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. उमा नदीतील जलमार्ग, बालाजी सागर तलावाचा प्रलंबित प्रश्न तसेच शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींकडे त्यांनी लक्ष वेधले. निवडणुकीच्या काळात महिलांना विविध आश्वासने दिली जातात, मात्र प्रत्यक्षात त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला. चिमूर जिल्ह्याच्या मागणीचाही त्यांनी पुनरुच्चार केला.
महामोर्चानंतर हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत विविध मागण्यांचे निवेदन चिमूर तहसीलदार यांना देण्यात आले.
यावेळी ॲड. दुष्यंत किरसान, धनराज मुंगले, राम राऊत, गजानन बूटके, विजय घरत, जुनेद खान, बब्बू खान, विवेक कापसे, शांताराम शेलवटकर, खेमराज मरसकोल्हे, विनोद बोरकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो शेतकरी उपस्थित होते.
सभेचे संचालन राजू दांडेकर यांनी केले. प्रास्ताविक विजय गावंडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजू कापसे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!