दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे सुरू
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे सुरू
खरीप हंगाम २०२६ : मूल तालुक्याचा ‘ट्रिगर-१’मध्ये समावेश; महसूल विभागाचे आवाहन
मूल : खरीप हंगाम २०२६ मध्ये दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतपिकांचे पंचनामे करण्याची कार्यवाही मूल तालुक्यात सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग तसेच आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या २५ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार दुष्काळ जाहीर करण्यासाठीच्या ‘ट्रिगर-१’च्या पहिल्या टप्प्यात मूल तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे.
शासन निर्णयानुसार, ज्या भागात पावसाचे प्रमाण कमी राहून दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, त्या भागात आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार मूल तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
३० सप्टेंबरपासून दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतपिकांची ग्रामपातळीवर पाहणी करून पंचनामे करण्यात येणार आहेत. यासाठी ग्राम महसूल अधिकारी/ग्रामपंचायत अधिकारी/सहाय्यक कृषी अधिकारी यांची त्रिस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीमार्फत गावनिहाय शेतकऱ्यांच्या संयुक्त पंचनाम्याची कार्यवाही केली जाणार आहे.
पंचनाम्यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव, आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक, बँक IFSC कोड, मोबाईल क्रमांक आदी माहिती अचूकपणे नोंदविणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
७/१२ वरील नावाबाबत विशेष सूचना
ज्या नुकसानग्रस्त खातेदाराच्या ७/१२ उताऱ्यावर एकापेक्षा अधिक नावे आहेत, अशा प्रकरणांमध्ये शेतपीक नुकसान अनुदान कोणत्या लाभार्थ्याच्या नावावर जमा करायचे, याबाबत आवश्यक माहिती देणे गरजेचे आहे. तसेच शेतपीक नुकसान अनुदानासाठी ज्या शेतकऱ्यांनी फार्मर रजिस्ट्री केलेली नाही, त्यांनी आपल्या गावातील ७/१२ उताऱ्याशी आधार लिंक करून AgriStack (ॲग्रीस्टॅक) नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
यामुळे कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी शेतपीक नुकसान अनुदानापासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे.
शेतकऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन
मूल तहसीलदार मृदुला मोरे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, शेतपीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या गावातील संबंधित ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी किंवा सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे व माहिती उपलब्ध करून द्यावी.
त्रिस्तरीय समितीमार्फत गावनिहाय पंचनामे पूर्ण केल्यानंतर नुकसानग्रस्त खातेदारांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालयात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. या याद्यांची गावपातळीवर वाचन करून आवश्यक ती दुरुस्ती अथवा हरकत नोंदविण्याची संधीही दिली जाणार आहे.
त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करून पंचनाम्याची कार्यवाही वेळेत पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार मृदुला मोरे, मूल यांनी केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!