सरडपार शेतशिवारात मध्यरात्री चोरट्यांचा डल्ला; दोन क्विंटल मोसंबी चोरली
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरी कैद; चिमूर पोलिसांत अज्ञात चोरांवर गुन्हा दाखल
प्रतिनिधी - शुभम बारसागडे
चिमूर/नेरी : - नेरीनजीकच्या सरडपार शेतशिवारात २८ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास एका फळबागेत घुसून अज्ञात चोरट्यांनी तब्बल दोन क्विंटल मोसंबी चोरून नेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. हा संपूर्ण प्रकार शेतातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला असून, याप्रकरणी चिमूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेरी येथील रहिवासी व बागायतदार शेतकरी अशोक तिडके यांची सरडपार शेतशिवारात शेती आहे. त्यांच्या शेतात मोसंबीची २०० झाडे असून इतर फळांचीही लागवड करण्यात आली आहे. सध्या शेतातील मोसंबीची झाडे फळांनी लगडली असून बाजारात विक्रीसाठी तोडणीची कामे सुरू आहेत.
दरम्यान, २८ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास तीन अज्ञात इसमांनी दोन मोटरसायकलवरून येत तिडके यांच्या फळबागेत बेकायदेशीररीत्या प्रवेश केला. शेतात कोणाचीही चाहूल नसल्याची संधी साधत चोरट्यांनी झाडांवरील सुमारे दोन क्विंटल मोसंबी तोडून लंपास केली.
सीसीटीव्हीमुळे फुटला भांडाफोड
शेतात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजची पाहणी केली असता, त्यात एक संशयित व्यक्ती आणि चोरीचा प्रकार स्पष्टपणे दिसून आला. यामुळे या चोरीचा भांडाफोड झाला.
या घटनेनंतर शेतकरी अशोक तिडके यांनी तातडीने चिमूर पोलीस स्टेशन गाठून आपबिती सांगत तक्रार नोंदवली. रात्रीच्या वेळी फळबागांमधून होणाऱ्या अशा चोऱ्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून, पोलिसांनी तात्काळ या चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्याकडून नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी तिडके यांनी केली आहे.
शेतकऱ्याच्या तक्रारीवरून चिमूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास वेगाने सुरू आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!