स्वयंशासन दिनी विद्यार्थ्यांनी सांभाळली शिक्षकांची भूमिका
सावित्रीबाई फुले विद्यालय पवनी येथे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती उत्साहात
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - सावित्रीबाई फुले विद्यालय, पवनी येथे भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या १३८व्या जयंतीनिमित्त स्वयंशासन दिनाचा उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिक्षकांची भूमिका, जबाबदारी तसेच शालेय प्रशासनाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली.
यावेळी विद्यार्थीनी रोशनी माहुरे हिने मुख्याध्यापिकाची तर हुमेरा शेख, मुस्कान खान, अस्मिरा हुसैन, अनुष्का मुंडले, सुहानी मुंडले, डिंपल मांढरे, खुशनुमा पठाण तसेच विद्यार्थी उत्कर्ष भोवते, नमन मेश्राम आदींनी शिक्षकांची भूमिका व विविध जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता गजभिये होत्या. प्रमुख अतिथी म्हणून राज्य पुरस्कृत शिक्षक अशोक गिरी, संदीप मुंडले, ललिता डेकाटे, अरुणा कांबळे, अर्चना दडवे व सुमय्या शेख उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यानंतर स्वयंशासन उपक्रमांतर्गत शिक्षक बनलेल्या विद्यार्थ्यांनी भाषणातून शिक्षकांचे महत्त्व, शिक्षणाची भूमिका आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबाबत आपले विचार व्यक्त केले. राज्य पुरस्कृत शिक्षक अशोक गिरी यांनी विद्यार्थ्यांना शिक्षक व शिक्षणाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणातून मुख्याध्यापिका सुजाता गजभिये यांनी शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा बौद्धिक, सामाजिक, भावनिक व सर्वांगीण विकास घडतो, असे सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हुमेरा शेख हिने केले, तर मुस्कान खान हिने आभार प्रदर्शन केले. शेवटी ‘वंदे मातरम्’च्या गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
स्वयंशासन दिनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, निर्णयक्षमता,आत्मविश्वास, शिस्त आणि जबाबदारीची भावना विकसित होण्यास मदत झली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!