मोदींच्या कथित AI पोस्टवरून सपकाळ अडचणीत?
मोदींच्या कथित AI पोस्टवरून सपकाळ अडचणीत?
चंद्रपुरात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरुद्ध तक्रार; सायबर चौकशीची प्रक्रिया सुरू
चंद्रपूर | प्रतिनिधी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अधिकृत फेसबुक पेजवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कथित आक्षेपार्ह AI-निर्मित छायाचित्र व मजकूर प्रसिद्ध केल्याच्या आरोपावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरुद्ध चंद्रपुरात तक्रार दाखल करण्यात आली आहे. चंद्रपुरातील वकील ॲड. योगेश्वर पचारे यांनी ही तक्रार केली असून, प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तक्रार सायबर पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ‘आपले सरकार’ तक्रार निवारण पोर्टलच्या माध्यमातून गृह विभागाकडे ही तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर गृह सचिवांच्या निर्देशानुसार पुढील तपासासाठी ती चंद्रपूरच्या सायबर पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याचे वृत्त आहे.
१० सप्टेंबरच्या पोस्टवर आक्षेप
तक्रारीनुसार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अधिकृत फेसबुक पेजवर १० सप्टेंबर २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कथित AI-निर्मित आक्षेपार्ह फोटो आणि त्यासोबत मजकूर प्रकाशित करण्यात आला होता. या पोस्टमुळे पंतप्रधानपदासारख्या घटनात्मक पदाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
या पोस्टच्या निर्मितीपासून ती सोशल मीडियावर प्रसारित करण्यापर्यंत नेमकी कोणाची भूमिका होती, पोस्ट अधिकृत पेजवर कोणी अपलोड केली आणि त्यामागे जबाबदार व्यक्ती कोण आहेत, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मुनगंटीवारांचे पोलीस अधीक्षकांना पत्र
दरम्यान, बल्लारपूरचे आमदार तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांना पत्र देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. संबंधित सोशल मीडिया पोस्ट, तिचा मजकूर आणि उपलब्ध डिजिटल पुराव्यांची पडताळणी करून पोस्ट तयार करणाऱ्या व प्रसारित करणाऱ्या व्यक्तींची ओळख निश्चित करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
तसेच तपासाअंती लागू कायदेशीर तरतुदींनुसार संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही मुनगंटीवार यांनी केली आहे.
आता सायबर तपासाकडे लक्ष
या प्रकरणात तक्रारीतील आरोपांची सत्यता, संबंधित फेसबुक पेजवरील पोस्टची अधिकृतता, पोस्ट तयार करणाऱ्या व्यक्तींची भूमिका आणि डिजिटल पुरावे यांची पडताळणी तपास यंत्रणेकडून केली जाणे अपेक्षित आहे.
दरम्यान, या प्रकरणावरून चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून, सायबर तपासातून नेमके काय समोर येते आणि या पोस्टसाठी जबाबदारी निश्चित होते का, याकडे आता लक्ष लागले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!