"प्रा. डॉ. लालचंद रामटेके यांना 'क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले' जिल्हास्तरीय आदर्श प्राध्यापक पुरस्कार"

शैक्षणिक, सामाजिक व राष्ट्रीय सेवा योजनेंतील उल्लेखनीय कार्याचा गौरव; सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - पवनी तालुक्यातील अशोक मोहरकर कला व वाणिज्य महाविद्यालय, अड्याळ येथील समाजशास्त्र विषयाचे प्राध्यापक तसेच राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. लालचंद किसन रामटेके यांना त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व विद्यार्थी विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत 'क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जिल्हास्तरीय आदर्श प्राध्यापक पुरस्कार' प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त दिनांक १ ऑगस्ट रोजी अशोक मोहरकर कला व वाणिज्य महाविद्यालय, अड्याळ येथे आयोजित विशेष कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई शाखेचे पवनी तालुकाध्यक्ष जयेंद्र चव्हाण यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकृष्ण पुंडलिक राऊत, प्रा. डॉ. विठ्ठल उगेमुगे, प्रा. सुधीर उके, प्रा. राजकुमार देशकर, प्रा. देवेंद्र वाहाने, डॉ. विद्या ठवकर, डॉ. राजू ढबाले, प्रा. संजय वैरागडे, प्रा. दीपक जामनीक तसेच लोकपरिवर्तन फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष रजत राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. डॉ. लालचंद रामटेके यांनी समाजशास्त्र विषयाच्या अध्यापनासोबतच राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, पर्यावरण संरक्षण, स्वच्छता अभियान, रक्तदान, ग्रामविकास, जनजागृती आणि विविध सामाजिक उपक्रम प्रभावीपणे राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार बहाल करण्यात आला.
या सन्मानाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, मित्रपरिवार तसेच विविध सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!