चिमूरमध्ये ईद-ए-मिलाद-उन-नबी उत्साहात साजरी

शोभायात्रेतून एकतेचा संदेश; पोलिसांकडून गुलाबपुष्प देत मुस्लिम बांधवांचे स्वागत

उप संपादक 
विलास मोहिणकर 

चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे ईद-ए-मिलाद-उन-नबीचा पवित्र सण चिमूर शहरात मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात, श्रद्धा आणि एकोप्याच्या वातावरणात साजरा केला. यानिमित्त सुन्नी रजा मस्जिदीपासून शहरातील प्रमुख मार्गांवरून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. संगीताच्या तालावर निघालेल्या या शोभायात्रेत मुस्लिम बांधवांसह युवा वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला.
या शोभायात्रेदरम्यान चिमूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा पोलीस निरीक्षक यांनी मुस्लिम बांधवांचे लाल गुलाबाचे फूल देऊन स्वागत केले तसेच ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या शुभेच्छा दिल्या. पोलिसांकडून करण्यात आलेल्या या स्वागतामुळे बंधुभाव आणि सामाजिक एकोप्याचे वातावरण अधिक दृढ झाले.
ईदच्या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमासोबतच सामाजिक बांधिलकी जपत चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात समस्त मुस्लिम बांधव व युवा वर्गाच्या वतीने रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. रुग्णांची विचारपूस करून त्यांना फळे देण्यात आली.
तसेच जामगाव येथील दिव्य वंदना आधार फाउंडेशन येथे भेट देऊन तेथील मनोरुग्णांनाही फळांचे वाटप करण्यात आले. समाजातील गरजू व आजारी व्यक्तींसोबत आनंद वाटून घेत ईदचा सण सामाजिक सेवेच्या भावनेतून साजरा करण्यात आला.
दरम्यान, शोभायात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चिमूर पोलिसांकडून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमात चिमूर शहरातील मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव, युवक व नागरिक एकोप्याने सहभागी झाले होते. धार्मिक उत्सवासोबतच सामाजिक सेवा, बंधुभाव आणि शांततेचा संदेश देणारा हा ईद-ए-मिलाद-उन-नबीचा कार्यक्रम चिमूर शहरात उत्साहात संपन्न झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!