ट्रकला दुचाकीची जोरदार धडक; २५ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू, सुरक्षा नियमांवर पुन्हा प्रश्नचिन्ह

शेगाव बु. स्मशानभूमीजवळ भीषण अपघात

तालुका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - वरोरा चिमूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 353 ई वरील शेगाव बु. येथील स्मशानभूमीजवळ मंगळवार, दि. 28 जुलै 2026 रोजी दुपारी सुमारे 1 वाजताच्या सुमारास ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंकित कोटीराम जीवतोडे (वय 25) हे एम एच 34 सी एच 7801 क्रमांकाच्या दुचाकीने शेगाव येथून नेहमीप्रमाणे जेवणासाठी आपल्या अर्जूनी गावाकडे जात होते. त्याचवेळी चिमूरच्या दिशेने जाणाऱ्या आईसर कंपनीच्या सिमेंट वाहतूक करणाऱ्या एमएच 34 सी क्यू 0575 क्रमांकाच्या ट्रकला त्यांच्या दुचाकीची धडक बसली.

अपघात अत्यंत भीषण होता. धडकेमुळे दुचाकीचा पुढील भाग पूर्णपणे चक्नाचूर झाला. दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनावेळी परिसरात पाऊस सुरू असल्याने दृश्यमानता कमी झाली होती. त्यामुळे अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबत पोलीस तपास सुरू असून परिसरातील काही नागरिकांकडून पावसामुळे समोरील वाहन स्पष्ट दिसले नसावे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही.

दरम्यान, अपघातग्रस्त ट्रकच्या मागील बाजूस नंबर प्लेट तसेच आवश्यक सुरक्षा उपकरणे (अंडर-रन प्रोटेक्शन/सेफ्टी गार्ड) नसल्याचा दावा काही स्थानिकांनी केला आहे. अशा सुरक्षा नियमांचे पालन होत असल्याची खातरजमा करून नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेंद्रसिंह यादव यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव पोलीस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!