बेवारस मनोरुग्णांच्या आधारवडाला ‘गुरुदेव कला मंच’ची मायेची साथ; डोमाजी आधार फाऊंडेशनला सदिच्छा भेट



तळोधी (बा.) प्रतिनिधी : समाजात अनेक बेवारस, निराधार आणि मनोरुग्ण व्यक्ती उपेक्षित जीवन जगत असतात. त्यांच्याकडे पाहण्यासही अनेकजण टाळाटाळ करतात. अशा निराधार व्यक्तींना मायेची ऊब, निवारा, उपचार आणि दोन वेळचे अन्न देऊन त्यांना जगण्याची नवी उमेद देण्याचे कार्य नांदेड येथील डोमाजी आधार फाऊंडेशन अविरतपणे करीत आहे. या सेवाकार्याला मानवतेचा सलाम करत गुरुदेव कला मंच, तळोधी (बा.) या बहुउद्देशीय संस्थेने फाऊंडेशनला सदिच्छा भेट देऊन सामाजिक बांधिलकीचे सुंदर दर्शन घडविले.
गुरुदेव कला मंचने नेहमीच समाजोपयोगी आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची परंपरा जपली आहे. डोमाजी आधार फाऊंडेशन परिसरातील बेवारस मनोरुग्णांना निवारागृहात आणून त्यांच्या आरोग्याची, जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था करत असल्याची माहिती मंचच्या पदाधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी वेळ न दवडता प्रत्यक्ष भेटीचा कार्यक्रम आयोजित केला.
यावेळी मंचचे अध्यक्ष सौरभ गिरडकर यांच्या अध्यक्षतेखाली छोटेखानी पण अत्यंत भावनिक कार्यक्रम पार पडला. प्रा. अतुल कामडी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमाला मुख्य प्रवर्तक दुर्गादास बाबनथडे, मार्गदर्शक भुपेश भाकरे सर, प्रभुजी म्हस्के सर, युवानेते जिवेश सयाम, विशाल गोपाले सर, प्रा. सुमित बोरकर सर, प्रमोद बाबनथडे, अजय बारस्कर, केशव कोरांगे सर, वैद्यराज सचिन कालेश्वर, चंदू निकोडे, नितीन भेंडाळे, वैभव बारसागडे, पत्रकार गोकुळ पाकमोडे तसेच विविध क्षेत्रात अग्रेसर असलेले डॉ. गौरव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात दुर्गादास बाबनथडे, प्रभुजी म्हस्के सर, भुपेश भाकरे सर आणि जिवेश सयाम यांनी मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा असल्याचे सांगत अशा संस्थांच्या पाठीशी समाजाने ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले.
यावेळी डोमाजी आधार फाऊंडेशनचे संस्थापक परमेश्वर मडावी यांना गुरुदेव कला मंचच्या वतीने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची प्रतिमा, किराणा संच आणि देणगी प्रदान करण्यात आली. या सन्मानामुळे उपस्थितांचे मन भारावून गेले.
बेवारस आणि मनोरुग्णांच्या आयुष्यात मायेचा दिवा पेटविणाऱ्या डोमाजी आधार फाऊंडेशनच्या सेवाकार्याला गुरुदेव कला मंचने दिलेली ही साथ म्हणजे समाजातील संवेदनशीलतेचा आणि मानवतेचा जिवंत संदेश ठरला. समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी पुढे येणाऱ्या अशा संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांमुळेच माणुसकी आजही जिवंत असल्याचा प्रत्यय या भेटीतून सर्वांना आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!