वाघाच्या बंदोबस्तासाठी ग्रामस्थ आक्रमक; १६ जुलैला बफर वनपरिक्षेत्र खडसंगी कार्यालयावर धडक मोर्चाचा इशारा
वाघाचा तात्काळ बंदोबस्त न झाल्यास आंदोलन अटळ; परिसरातील ग्रामस्थांचे वन विभागाला निवेदन
वॉकी टॉकी टॉवर चढून शोले चित्रपट स्टाईल ने होणार आंदोलन
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पांअंतर्गत येणाऱ्या खडसंगी (बफर) वनपरिक्षेत्रातील वाढत्या वाघांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली आहे. यासंदर्भात मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, २३ एप्रिल २०२६ रोजी वहाणगाव येथील शेतकरी शंकर दादाजी मसराम (वय ५५) यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यानंतर ६ जुलै २०२६ रोजी बरडघाट लगत असलेल्या त्याच नियतक्षेत्रातील बोथली - II कक्ष क्रमांक ५५ मध्ये स्व.राजेंद्र तिमाजी भोयर (रा. नवेगाव पुनर्वसन ता.चिमूर जिल्हा चंद्रपूर यांचाही वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. सलग घडणाऱ्या या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
बरडघाट, पांढरपौनी, इरी, खडसंगी व परिसरातील गावांमध्ये वाघाचा मुक्त संचार सुरू असल्याने शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. शेतात काम करणे, जनावरे चारण्यासाठी जाणे तसेच दैनंदिन हालचाली करणेही धोकादायक बनले असल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे.
घटनांनंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन आश्वासने दिली असली, तरी प्रत्यक्षात कोणतीही ठोस व प्रभावी कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे वन विभागाच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.
वाघाचा तात्काळ बंदोबस्त न झाल्यास दि. १६ जुलै २०२६ रोजी खडसंगी (बफर) वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर आंदोलन व कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी निवेदनातून दिला आहे. आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीची जबाबदारी वन विभाग व प्रशासनाची राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
ग्रामस्थांनी नागरिकांच्या जीवित सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत वाघाचा तात्काळ बंदोबस्त करून प्रभावी उपाययोजना राबविण्याची मागणी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!