उत्तुंगतेज बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत कर्तव्य बोन्दगुलवार राज्यात सातवा..
इस्रो शैक्षणिक सहलीसाठी निवड..
वरोरा...जगदीश पेंदाम
उत्तुंगतेज फाउंडेशनतर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षा 2026 मध्ये नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, शेगाव (बु.), ता. वरोरा, जि. चंद्रपूर येथील विद्यार्थी कर्तव्य बोन्दगुलवार याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. परीक्षा व मुलाखत या दोन्ही टप्प्यांतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याने 150 पैकी 124 गुण प्राप्त करून राज्यात सातवा क्रमांक पटकावला आहे.
उत्तुंगतेज फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनाची आवड व नवोपक्रमशील विचार विकसित करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केले जाते. राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. कठीण स्पर्धेत कर्तव्यने आपल्या बुद्धिमत्ता, परिश्रम व वैज्ञानिक विचारसरणीच्या बळावर राज्यातील गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शाळा, पालक व जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.
या यशाबद्दल त्याची प्रतिष्ठित इस्रो (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) शैक्षणिक सहलीसाठी निवड करण्यात आली आहे. या सहलीमुळे त्याला अंतराळ विज्ञान, संशोधन प्रक्रिया व आधुनिक तंत्रज्ञान यांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांसाठी ही संधी अत्यंत प्रेरणादायी मानली जाते.
कर्तव्यच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक बी. जी. ढाकूणकर,शेरखा पठाण (शाळा व्यवसथापण समिती ),शिक्षकवृंद नरेन्द्र कन्नाके, संतोष कडूकर, ए. पी. चांगले, विलास मत्ते,माधव गिरडे, प्रशांत उरकुडे, पालक तसेच परिसरातील नागरिकांनी त्याचे अभिनंदन केले आहे. शाळेतील शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे आणि पालकांच्या प्रोत्साहनामुळे हे यश शक्य झाल्याची भावना कर्तव्यने व्यक्त केली.
नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, शेगाव (बु.) येथील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, क्रीडा व विविध स्पर्धांमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत शाळेची गौरवशाली परंपरा कायम ठेवली आहे. कर्तव्य बोन्दगुलवारच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण शाळा व चंद्रपूर जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे..



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!