राजस्थानातून ‘ड्रग्स माफिया’ अटकेत; भद्रावती पोलिसांची मोठी कारवाई
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
भद्रावती : - भद्रावती पोलिसांनी गुंगीकारक औषधीद्रव्य प्रकरणात धडाकेबाज कारवाई करत राजस्थानातून मुख्य आरोपीला अटक केली आहे. या कारवाईमुळे आंतरराज्यीय अंमली पदार्थ रॅकेटचा मोठा धागा पोलिसांच्या हाती लागला असून, संपूर्ण साखळी उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पोलीस स्टेशन भद्रावती येथे अपराध क्रमांक ६३२/२०२६ अंतर्गत गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ च्या कलम ८(क), २२(क) व २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. ०३ जून २०२६ रोजी मध्यरात्री भद्रावती येथील जमघट हॉटेल परिसरात संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत काही संशयितांची चौकशी केली. तपासात आरोपींकडून अंमली पदार्थ बाळगणे आणि विक्रीसाठी साठवणूक केल्याचे उघड झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणातील फिर्यादी विनोद गजानन भुरले (रा. चंद्रपूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. तपासादरम्यान अटक आरोपी अब्दुल सिराज अब्दुल गफ्फार याची कसून चौकशी व तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. त्यातून आकिब जावेद उर्फ टिपू सलीम जावेद खान (वय ३०, रा. मारवार जंक्शन, जि. पाली, राजस्थान) याचा या गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाला.
यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रावती पोलिसांचे विशेष पथक राजस्थानात रवाना झाले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने सखोल शोधमोहीम राबवून दि. १९ जून २०२६ रोजी सकाळी आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
ही कारवाई पोउपनि संतोष केदार, पोहवा संतोष येलपुरवार, जयसिंह तसेच पोशि प्रेमकुमार यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. अटकेनंतर आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून पुढील तपासासाठी दोन दिवसांचा ट्रांझिट वारंट मिळविण्यात आला आहे.
सध्या आरोपीकडून अंमली पदार्थांचा स्त्रोत, पुरवठा साखळी, आर्थिक व्यवहार, इलेक्ट्रॉनिक पुरावे तसेच इतर संबंधित आरोपींबाबत सखोल चौकशी सुरू आहे.
संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल, पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच सपोनी बलराम झाडोकार यांनी तांत्रिक मदत केली.
या कारवाईमुळे अंमली पदार्थांच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त होत असून, भद्रावती पोलिसांच्या या धाडसी मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!