सुपर फॉस्फेटयुक्त खताचा वापर करा; पिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढेल – पद्माकर गिदमारे

पालोरा (चौ.) येथे शेतकरी–शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम उत्साहात संपन्न

तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - तालुका कृषी अधिकारी कार्यालय पवनी आणि प्रकल्प (आत्मा) भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका बीज गुणन केंद्र, पालोरा (चौ.) येथे १२ जून रोजी शेतकरी–शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमात शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन आणि खतांच्या योग्य वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आत्मा भंडारा यांच्या प्रकल्प संचालक उर्मिला चिखले या होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे उपस्थित होते. तसेच तालुका कृषी अधिकारी सोनाली गजबे, प्रगतिशील शेतकरी पुंडलिक घार, नरेंद्र आयतुलवार, अनिल ब्राम्हणकर, अजय शहारे, सागर कृषी अवजार केंद्र चिमूरचे संचालक महेंद्र खिरडकर, कोंढा मंडळ अधिकारी विजय हुमणे व पवनी मंडळ अधिकारी दिनेश काटेखाये आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष उर्मिला चिखले यांच्या हस्ते तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन करताना उपविभागीय कृषी अधिकारी पद्माकर गिदमारे यांनी शेतकऱ्यांना हवामान व पर्जन्यमान लक्षात घेऊन १२० ते १३० दिवस कालावधीची बियाणे वापरण्याचा सल्ला दिला. तसेच रोपांची लागवड जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत पूर्ण करणे आवश्यक असल्याचे सांगितले. खत व्यवस्थापनामध्ये सुपर फॉस्फेटयुक्त खतांचा वापर करावा व पहिल्या मात्रेमध्ये पोटॅशयुक्त खतांचा समावेश केल्यास पिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढून किडी व रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

डीएसआर (डायरेक्ट सीडेड राईस) पद्धतीने पेरणी केल्यास उत्पादनात काही प्रमाणात घट झाली तरी उत्पादन खर्चात बचत होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच शेतकऱ्यांनी अधिकाधिक प्रमाणात हिरवळीच्या खतांचा वापर करून जमिनीची सुपीकता वाढवावी, असे आवाहन केले.

अध्यक्षीय समारोपात प्रकल्प संचालक उर्मिला चिखले यांनी कृषी केंद्रांकडून खत किंवा औषधांच्या विक्रीवेळी एमआरपीपेक्षा जास्त दर आकारला जात असल्यास शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करावी, असे आवाहन केले.

कार्यक्रमाला तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उप कृषी अधिकारी भूमेश्वरी येरणे यांनी केले, तर सहाय्यक कृषी अधिकारी पी. बी. खेकारे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषी विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!