वर्धा नदीवरील 110 वर्षांचा इंग्रजकालीन दगडी पूल आजही इतिहासाची साक्ष देत उभा
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना जोडणारा वर्धा नदीवरील इंग्रजकालीन दगडी पूल आजही आपल्या भक्कम बांधकामामुळे इतिहासाची साक्ष देत उभा आहे. सुमारे 110 वर्षांपूर्वी ब्रिटिश काळात बांधण्यात आलेल्या या पुलाने अनेक पिढ्यांचा प्रवास पाहिला असून आजही तो स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना मानला जातो.
ब्रिटिश राजवटीत दळणवळणाची साधने विकसित करण्यासाठी रेल्वे, पोलीस ठाणे, शाळा, दवाखाने आणि पूल यांसारख्या अनेक वास्तू उभारण्यात आल्या. त्याचाच एक भाग म्हणून वर्धा नदीवरील या पुलाच्या बांधकामाची योजना आखण्यात आली. 1914 मध्ये या पुलाच्या बांधकामास सुरुवात झाली आणि सुमारे साडेचार ते पाच वर्षांच्या कालावधीनंतर 1917 मध्ये हा पूल पूर्णत्वास आला.
पुलाचे बांधकाम करण्यासाठी परिसरातील अनेक गावांतील नागरिकांनी मोलमजुरी केली. भारसोडा, विष्णूर, परतोडा, खडका, जळगाव, तळेगाव, आष्टी आदी गावांतील शेकडो महिला-पुरुष या कामात सहभागी झाले होते. बांधकामासाठी लागणारा दगड वर्धा नदीच्या पात्रातून काढण्यात आला, तर चुनखडी, जवसतेल, डिंक, उडीद डाळ व विविध वनस्पतींचा वापर करून विशेष मिश्रण तयार करण्यात आले होते.
या पुलाची खासियत म्हणजे त्याच्या खाली असलेल्या 25 दगडी कमानी. आजही या कमानींमधून वर्धा नदीचा प्रवाह वाहत असतो. पुलावरील बाराव्या कमानीवर बांधकामासंदर्भातील शिलालेख कोरलेला असल्याचे सांगितले जाते.
1990 नंतर सुरक्षेच्या कारणास्तव या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. त्यानंतर नदीवर नवीन दोन पूल बांधण्यात आले. त्यामुळे आज वर्धा नदीवर एकूण तीन पूल अस्तित्वात आहेत. मात्र, 1917 मध्ये उभारलेला हा ऐतिहासिक दगडी पूल आजही पुराच्या तडाख्यांना तोंड देत भक्कमपणे उभा आहे.
इतिहास, स्थापत्यकला आणि ब्रिटिशकालीन अभियांत्रिकीचा अनमोल ठेवा असलेला हा पूल भावी पिढ्यांसाठी जतन करण्याची गरज असल्याची भावना इतिहासप्रेमी व्यक्त करीत आहेत.
-- शब्दांकन - प्रा.डॉ.रवि दलाल.तिवसा
✍️संकलन - विद्रोही अविनाश गोंडाणे ,अमरावती ९९२३२६४१९३


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!