बल्लारपुरात बुद्ध पूर्णिमा निमित्त धम्मचक्र महानाट्याचे भव्य आयोजन
बल्लारपुरात बुद्ध पूर्णिमा निमित्त धम्मचक्र महानाट्याचे भव्य आयोजन
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त बुद्ध पूर्णिमा समारोह समिती, पेपर मिल बल्लारपूरच्या वतीने धम्मचक्र या भव्य महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या शुक्रवार, १ मे २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता बी.पी.एम. कलामंदिरच्या खुल्या रंगमंचावर या महानाट्याचे सादरीकरण होणार आहे.
कृति थिएटर अँड स्पोर्ट्स अकादमी, नागपूर प्रस्तुत या तीन अंकी महानाट्यात सुमारे ६० कलाकारांचा सहभाग आहे. भगवान गौतम बुद्ध यांच्या जीवनकाळात सुरू झालेल्या धम्म प्रवाहाचा इतिहास, चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या काळातील धम्मचक्राची प्रगती तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनाची गाथा या महानाट्यातून प्रभावीपणे मांडण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे, हे महानाट्य पूर्णपणे विनामूल्य असून, सुमारे ५६ फूट × ३६ फूट आणि ८ फूट उंचीच्या भव्य मंचावर लेझर लाइट व साउंडसह सादर होणार आहे. पूर्व विदर्भात अशा प्रकारची ही पहिलीच भव्य प्रस्तुती असल्याचे आयोजकांनी सांगितले.
कार्यक्रमापूर्वी सामूहिक बुद्ध वंदना व मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. यावेळी राजेश डी. गायकवाड महाप्रबंधक, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, चंद्रपूर, बिपिन इंगळे पोलीस निरीक्षक, बल्लारपूर, उदय कुकडे प्रमुख, बीजीपिपीएल बल्लारपूर, प्रवीण शंकर महाप्रबंधक मानव संसाधन, बीजीपिपीएल आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सदर माहिती विश्रामगृह, बल्लारपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी समितीचे अध्यक्ष अतुल शेंडे, महासचिव आकाशकांत दुर्गे, कार्याध्यक्ष रितेश बोरकर यांच्यासह महेंद्र रामटेके, नीलकंठ पाटील, विकास जयकर, पवन मेश्राम, विश्वास देशभ्रतार, राजेश गावंडे, आनंद वाळके, विकास पेटकर, सुमेध शेंडे, प्रीतम उमरे, राजकुमार सोनारकर आदी सदस्य उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!