''... तर सहकार्यांसोबत रस्त्यावर उतरून आंदोलन करू'' नगराध्यक्षा एकता समर्थ यांचा इशारा नेमका कुणाला?
... तर सहकार्यांसोबत रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा नगराध्यक्षा एकता समर्थ यांचा इशारा!
मूल (प्रतिनिधी):
शांत आणि सयंमी असलेल्या मुल शहरात मालधक्का झाल्यास शहराची दुर्दशा होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत मूल शहरात मालधक्का होणार नाही यासाठी नगर परिषद नागरीकांसोबत राहील. वेळ आलीच तर मी स्वत: माझे सहकार्यासोबत रस्त्यावर उतरून प्रसंगी जेलमध्ये जावू अशी ठाम भुमिका मूलच्या नगराध्यक्षा एकता प्रशांत समर्थ यांनी घेत मालधक्याला विरोध दर्शविला. मूल शहर बचाव समितीचे वतीने आयोजीत पत्रकार परिषदेत आॅनलाईन सहभागी होत, त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्या समर्थकांकडून सह्यांची मोहीम राबवली जात असल्याचे सांगितले जाते. मात्र निवेदनावर तसा कोणताही उल्लेख नसल्याने याबाबत पुष्टी होऊ शकली नाही.
या पार्श्वभूमीवर “मूल शहर बचाव संघर्ष समिती” स्थापन करण्यात आली असून, समितीच्या वतीने मालधक्का हटाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. शहर प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
उल्लेखनीय म्हणजे, मूल शहरापासून केवळ पाच किमी अंतरावर आणि याच रेल्वे लाईनवर केळझर येथे खनिज वाहतूकीचे मालधक्का असतांना, पुन्हा नव्याने मालधक्याची मागणी करण्याची गरजच काय? असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे.
शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी या प्रकल्पाला जोरदार विरोध दर्शविला. मालधक्का उभारल्यास स्थानिकांना अपेक्षित रोजगार मिळणार नसून, केवळ काही स्वार्थी घटकांना फायदा होईल, असा आरोप करण्यात आला. रोजगाराच्या नावाखाली नागरिकांची दिशाभूल होत असल्याचेही सांगण्यात आले.
मालधक्क्यामुळे जल, वायू व ध्वनी प्रदूषणात मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. सध्या स्वच्छ व विकसित म्हणून ओळख असलेले मूल शहर प्रदूषित होण्याचा धोका आहे. तसेच, दररोज 700 ते 800 अवजड वाहनांची वाहतूक होणार असल्याने अपघातांचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
सुरजागड परिसरातून होणाऱ्या लोहखनिज वाहतुकीदरम्यान सूक्ष्म धूळ व रासायनिक घटक हवेत पसरून आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. यामुळे परिसर लालसर होण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली.
प्रस्तावित मालधक्क्याच्या परिसरात कर्मवीर महाविद्यालयाचे मैदान, तसेच नवभारत विद्यालय, नवभारत कन्या विद्यालय, नवभारत कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, कर्मवीर महाविद्यालय आणि पंचायत राज प्रशिक्षण केंद्र या शैक्षणिक संस्था आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्य व शैक्षणिक वातावरणावर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
याशिवाय, हा परिसर ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनलगत असल्याने वन्यजीवांवरही गंभीर परिणाम होऊ शकतो. वाघ, अस्वल, बिबट यांसारख्या प्राण्यांचा वावर असलेल्या या कॉरिडॉरमध्ये मानवी हस्तक्षेप वाढल्यास मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.
समितीच्या वतीने प्रस्तावित मालधक्का प्रस्तावाला मंजूरी देण्यात येवू नये अशी मागणी करण्यात आली असून, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मालधक्का मूल साठी:सह्या जिल्हाभरात
मूल शहरात मालधक्का करण्यात यावा या मागणीला स्थानिक नागरीकांनी विरोध दर्शविल्यांने, मालधक्याचे समर्थनार्थ जिल्हाभरात सह्यांची मोहीम राबविण्यात येत असल्यांची माहितीही यावेळी देण्यात आली. ब्रम्हपुरी, सिंदेवाही, जिवती तालुक्यातून या सह्या गोळा करण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वाघांचे वाढते हल्यामुळे नागरीक त्रस्त आहेत, याचाच फायदा घेत, अनेक गावात वाघाचा बंदोबस्त करण्यांचे कारण सांगून निवेदनावर सह्या घेत असल्यांचे तर जिवती तालुक्यात पट्टे देण्याचे अमिष दाखवून सह्या घेत असल्यांचे सांगण्यात आले. या निवेदनावर कोणत्याही संघटनेचे किंवा जबाबदार व्यक्तीचे नांव नसल्यांने, या निवेदनाचा बोलविता धनी कोण असा प्रश्नही आता निर्माण झाला आहे.
या पत्रकार परिषदेला सामाजीक कार्यकर्ते अनिल मोगरे, उद्योजक जीवन कोतंमवार, ॲड. प्रणव वैरागडे,नप सभापती प्रशांत समर्थ जेष्ठ पत्रकार संजय पडोळे, विजय सिद्धावार, प्रा. प्रशांत वासाडे, ॲड. अश्विन पॉलिकर यांनी पत्रकार परिषदेला संबोधीत केले. यावेळी नप सभापती नलीनी आडपवार, दिनेश गोयल, डेव्हिड खोब्रागडे, कैलास चलाख, अतुल गोवर्धन, प्रशांत उराडे, प्राचार्य अविनाश गरपल्लीवार, कैलास चलाख, अमोल बच्चुवार जगदीश कडस्कर, नरेश बोमनवार, संदीप मोहबे, लवनीश उधवानी, विवेक मादांडे, राकेश मोहुर्ले, श्रीकांत बुक्कावार, महेश गाजुलवार, दत्तू समर्थ, शिवम चलावार, प्रा. विजय लोनबले, संजय भुसारी, राहुल बोमनवार, पंकज सोनूलवार, चेतन कामडे, अनिल समर्थ, फरजाना शेख, आदी मान्यवर उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!