जलजीवन मिशन योजनेची कामे निधीअभावी रखडली - तालुक्यात अनेक गावात पाणी टंचाई 🚰 ३१ मार्चला मध्यरात्री ९० लाख रुपये पाठवण्याचा सरकारचा हास्यास्पद प्रकार
सावली - हर घर जल या पाणीपुरवठा जलजीवन मिशन योजनेचा सावली तालुक्यात बट्ट्याबोळ झालेला असून अनेक गावातील कामे अर्धवट ठेवल्याने पाण्यासाठी भटकण्याची वेळ आणून ठेवलेली आहे तर शासनही कामासाठी निधी देत नसल्याने अधिकारी काम करून घेण्यास ग्रामीण पाणीपुरवठा विभाग हतबल ठरत आहेत. जिल्ह्यात करोडो रुपयाच्या निधीची गरज असतांना ३१ मार्चला मध्यरात्री फक्त ९० लक्ष रुपये जिल्हा परिषदला प्राप्त झाल्याने या हास्यास्पद प्रकारावरून सरकार पाणी प्रश्नावर किती गंभीर आहे हे दिसून येत आहे.
१५ ऑगष्ट २०१९ मध्ये लाल किल्यावरून देशाला संबोधीत करतांना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या 'हर घर नलसे जल' या योजनेची घोषणा केली. २०२४ पर्यंत देशातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पुरविला जाईल असे आश्वस्त करण्यात आले.
''मै आज लाल किले से घोषणा करता हूं कि आने वाले दिनों में हम जल जीवन मिशन को और आगे बढायेंगे । केंद्र और राज्य संयुक्त रूप से इस जल जीवन मिशन पर काम करेगी। हमने आने वाले वर्षों में इस मिशन पर ३.५० लाख करोड रूपये से अधिक खर्च करने का वादा किया है" ।
जलजीवन योजनेच्या प्रभावी अमंलबजावणीकरीता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २९ सप्टेंबर २०१९ रोजी देशातील सर्वच सरपंच यांना पत्र पाठवून ही योजना सामाजीक स्वास्थाकरीता राबविण्याचे आवाहन केले. प्रत्येक व्यक्तीमागे ५५ लिटर पाणी देता येईल असे नियोजन या योजनेत करावयाचे होते. लोकसंख्यानुसार तेवढ्या क्षमतेच्या पाणी टाकी (जलकुंभ) बांधकाम करावयाचे होते. देशभर या योजनेचा गवगवा झाला मात्र सावली तालुक्यात अजूनही 'हर घर नलसे जल' योजनेचा पाणी मिळालेला नाही. मागील ४ वर्षांपासून ही कामे सुरु असून पाण्यापासून ही गावे वंचित आहेत. पाणी हा मूलभूत प्रश्न असतांना ग्रामीण जनतेला पाण्यापासून वंचित ठेवण्याचा प्रकार शासनकडून होत असतांना मात्र जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यावर गंभीर नसल्याने नागरिकांची ओरड आहे.
महाराष्ट्र शासनाने जलजीवन मिशन ही योजना २०२२ पासून सुरू केली त्यात प्रत्येक घरी नळ व शुद्ध पिण्याचे पाण्याची योजना आखली आहे. सावली तालुक्यात ५५ कामे ५० कोटी रकमेची मंजूर आहेत. ५५ पैकी बारा कामे पूर्ण झालेली असून ९ कामाची विद्युत व्यवस्था बाकी आहे तर ३४ कामे अपूर्ण अवस्थेत आहेत.
🚰 जलजीवन मिशन योजनेत अर्धवट असलेली कामे
खेडी, चांदली बुज., सायखेडा, नवेगाव तुकूम, बारसागड, मंगरमेंढा, दाबगाव, पांढरसराड. उपरी, कापसी, सोनापूर, बोरमाळा, करोली, गायडोंगरी, जांब केरोडा, कसरगाव, विहीरगाव, करोली, उसरपार चक, कवठी व इतर गावे आहेत.
💰 ३१ मार्चला १ हजार कोटीपैकी ९० लाख रुपये खर्चासाठी देण्याचा हास्यास्पद प्रकार
जलजीवन मिशन अंतर्गत अनेक कामे करण्यात आली. झालेल्या कामाचा निधी ३१ मार्चपर्यंत येईल ही आशा अधिकारी व कंत्राटदार यांना होती. सर्वांचे लक्ष लागले असतांना मात्र १ हजार कोटीच्या कामासाठी ९० लाख रुपये चंद्रपूर जिल्हा परिषदला ३१ मार्च रोजी रात्री ११.३० ला प्राप्त झाले. खर्च करण्याचा कालावधी फक्त ३० मिनिट असल्याने हा निधीसुद्धा अखर्चिक राहिला आहे. या प्रकारावरून पाणी प्रश्नावर सरकार किती गंभीर आहे हे दिसून येत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!