तुझा "ओटीपी" आला रे बाबा, आता तरी ये ना! मूलवासियांचे सिलेंडरला अनावृत्त पत्र

प्रिय गॅस सिलेंडर उर्फ “मूल शहराचा सुपरस्टार”,
साष्टांग नमस्कार,
राम- राम, जय भीम, सलाम वालेकू..!


सर्वप्रथम, तुझ्या वाढत्या लोकप्रियतेबद्दल तुझे हार्दिक अभिनंदन! पूर्वी तुम्ही फक्त स्वयंपाकघरात शांतपणे बसणारे साधे सिलेंडर होता… पण आता? अरे बापरे! तू तर आता VVIP झालास! तुला भेटण्यासाठी लोक लाईन लावतात, भांडतात, गाडीवर चढतात – अगदी चित्रपटातल्या हिरोसारखी "एंट्री"  झाली आहे तुझी बाबा!
मूल शहरातून तुझं अचानक “गायब होणं” हे तर एखाद्या थरारक चित्रपटाच्या क्लायमॅक्ससारखंच झालं. एजन्सी वाले तुझ्यासोबत अनैतिक चाळे केले आणि एजन्सीला पोक्सो लागला. एच पी वाले तुम्ही थेट सावली-चिचपल्लीला “टूर”ला निघून गेलात. कुणाचं नाव कुठे, ग्राहक नंबर कुठे – सगळं इतकं गुंतागुंतीचं झालंय की आम्हाला वाटतं, तुम्ही स्वतःच गोंधळून गेला असाल – “मी कोणाच्या घरी जायचं रे बाबा?”
तुमच्यासाठी आता लोकांची धडपड बघण्यासारखी आहे. गाडी दिसली की महिलांची "अ‍ॅक्शन एंट्री" होते – थेट गाडीवर चढून सिलेंडर पकडायचा! जणू काही “जो पकडेल तोच मालक!” असा खेळ चाललाय. काहीजण तर तुम्हाला “अपहरण” करून नेतात म्हणे – चार सिलेंडर चोरी गेलेत! तुम्ही ठीक आहात ना? कुठे तरी सुरक्षित आहात ना?
आणि तो ओटीपी… अहाहा! तो येतो तेव्हा वाटतं, आता तुम्ही येणार… पण मग तुम्ही पुन्हा गायब! हा तर एखाद्या प्रेमकथेतील “तू येणार होतास पण आलाच नाहीस” असा सीन झालाय. आता तर त्या ओटीपी चा वर्षश्राध्द साजरा करण्याची वेळ आली आहे. तुझ्या सुरक्षेच्या दिमतीला असलेल्या एजन्सीला फोन केला तर ते उचलत नाहीत – एकदाचे पीएमओ कार्यालयातील फोन उचलले जातील, मुख्यमंत्रीही फोन उचलतील, पण तुला हाताळणारे ते मात्र पंतप्रधानांचे बाप झाले बहुतेक!
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर तर तुम्ही चर्चेचा मुख्य विषय आहात. राजकारण, क्रिकेट, सिनेमा – सगळं बाजूला ठेवा… “आज सिलेंडर कुठे आहे?, कोणत्या वार्डात गाडी लागणार आहे? ” हाच मूलचा खरा प्रश्न बनलाय.
बाहेरचं युद्ध संपलं म्हणे… पण मूल शहरात तुमच्यासाठीचं “महायुद्ध” अजूनही सुरू आहे. रोज शेकडो लोक लाईनमध्ये तुझ्या रिकाम्या उपाशी पोटी भावाला घेऊन उभे राहतात – जणू काही तुमच्या दर्शनासाठीच रांग लागली आहे!
म्हणून आता एकच विनंती – इतकाही हूरडून जाऊ नकोस ! थोडं साधं जीवन जगा आणि आमच्या स्वयंपाकघरात परत या. नाहीतर आम्ही लाकडावर स्वयंपाक करायला शिकू… पण मग तुम्ही पुन्हा “फ्लॉप हिरो” होऊ नका!
लवकर या, नाहीतर पुढच्या पत्रात आम्ही तुमच्यावर “मिसिंग”ची जाहिरात देऊ!
तुमचाच,
तुमच्यावर जीव ओवाळून टाकणारा (पण सध्या उपाशी) ग्राहक
मूल शहरातून

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!