फक्त ५० रुपयांची तक्रार… आणि शाळेत घडली थरकाप उडवणारी घटना!
५० रुपयांच्या तक्रारीवरून विद्यार्थ्याला बेदम मारहाण; कोठी आश्रमशाळेत संताप, निलंबनाची मागणी
गडचिरोली, दि. १३ एप्रिल २०२६ — अवघ्या ५० रुपयांच्या हरवलेल्या रकमेची तक्रार करायला गेलेल्या नववीतील विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना भामरागड तालुक्यातील कोठी येथील शासकीय आश्रमशाळेत घडली आहे. किरकोळ कारणावरून विद्यार्थ्याला इतक्या निर्दयीपणे मारहाण करण्यात आली की तो बेशुद्ध पडल्याची माहिती समोर आली असून, या प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
या प्रकरणात संबंधित अधिक्षक, मुख्याध्यापक सागर आमनेरकर यांच्यावर मारहाणीचा आरोप करण्यात आला असून, तसेच शाळेचे मुख्याध्यापक यांच्यावरही निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे.
या घटनेच्या निषेधार्थ कोठी ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामस्थ व पालकवर्ग मोठ्या संख्येने १३ एप्रिल रोजी ग्रामपंचायत कार्यालयात एकत्र जमले. त्यांनी संबंधित मुख्याध्यापक व शिक्षक सागर आमनेरकर यांना तात्काळ निलंबित करण्याची जोरदार मागणी केली.
घटनास्थळी प्रकल्प अधिकारी, भामरागड हे देखील उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थ व पालकांनी अधिकाऱ्यांना निवेदन सादर करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, अशा प्रकारांमुळे आश्रमशाळांतील व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!