वनजमिनीच्या लढाईत कोलाम बांधवांचा ऐतिहासिक विजय; वकिलांचा मूर्ती येथे भव्य सत्कार

वनजमिनीच्या लढाईत कोलाम बांधवांचा ऐतिहासिक विजय; वकिलांचा मूर्ती येथे भव्य सत्कार



राजुरा (प्रतिनिधी):

तालुक्यातील मूर्ती येथील कोलाम बांधवांनी वनजमिनीवरील अतिक्रमणाच्या वादात तब्बल १० वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर जिल्हा सत्र न्यायालयात विजय मिळवला आहे. या न्यायालयीन लढाईत भक्कम बाजू मांडणाऱ्या अ‍ॅड. फराहत बेग आणि अ‍ॅड. कल्याण कुमार यांचा कोलाम बांधवांच्या वतीने २४ जानेवारी २०२५ रोजी मूर्ती येथे शाल व श्रीफळ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.

१० वर्षांचा संघर्ष आणि न्यायालयीन विजय

​मूर्ती येथील १६ कोलाम बांधवांना वनविभागाने वनजमिनीवरील अतिक्रमण हटवण्याबाबत तगादा लावला होता. आपल्या हक्काच्या जमिनी वाचवण्यासाठी या बांधवांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. १० वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर जिल्हा सत्र न्यायालयाने कोलाम बांधवांच्या बाजूने निकाल दिला. या विजयामुळे कोलाम वस्तीवर आनंदाचे वातावरण असून, हा निकाल आदिवासींच्या जमीन हक्कासाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

संघटना आणि सातत्यामुळेच न्याय: पारोमिता गोस्वामी

​कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रमिक एल्गारच्या अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी होत्या. यावेळी मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या की, "संघटनेच्या माध्यमातून आपले हक्क मिळवणे शक्य आहे, त्यासाठी जनतेने सदैव संघटित राहावे." तर सत्काराला उत्तर देताना अ‍ॅड. फराहत बेग आणि अ‍ॅड. कल्याण कुमार यांनी सांगितले की, वकिलांच्या सातत्यपूर्ण संपर्कात राहून कायदेशीर लढा दिल्यास अशक्य गोष्टीही शक्य होतात.

मान्यवरांची उपस्थिती

​यावेळी घनश्याम मेश्राम यांनी कोलाम बांधवांच्या विविध समस्यांवर प्रकाश टाकला. अ‍ॅड. मधुकर कोटनाके यांनी 'कोलाम गुड्ड्याची यात्रा' हे पुस्तक भेट देऊन समाजाला संघटित राहण्याचे आवाहन केले.

​व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून शामराव कोटनाके, जंगु वेडमे, तुळशीराम किन्नाके आदी उपस्थित होते. या विजयोत्सवात टिल्लु रामु आत्राम, मारोती गंगु सिडाम, लिंगु सिन्नु कुंभरे, भिमराव कोडापे, लक्ष्मण मडावी, विमल कोडापे, गंगाधर आदे, संतोष किन्नाके यांच्यासह शेकडो नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!