डॉ.आंबेडकर हायस्कूल पवनी येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात

विविध ठिकाणी ध्वजारोहण, शानदार प्रभात फेरी आणि खेळाडूंचा सत्कार

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - दि.२६/०१/२०२६ स्थानिक भारत सेवक शिक्षण संस्था,पवनी द्वारा संचालित डॉ. आंबेडकर हायस्कूल येथे ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरात प्रभात फेरी काढण्यात आली असून क्रीडा क्षेत्रात नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यालयाच्या प्रांगणात संस्थेचे सदस्य संघर्ष राऊत यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. जुन्या इमारतीच्या प्रांगणात संस्था अध्यक्ष अवनती राऊत यांच्या शुभहस्ते व सचिव विकास राऊत यांच्या अध्यक्षतेखाली ध्वजारोहण संपन्न झाले.तसेच सिद्धार्थ वसतिगृह येथे संस्था सचिव विकास राऊत यांच्या हस्ते,तर डॉ.आंबेडकर चौक येथे विजय रायपूकर यांच्या हस्ते तिरंगा फडकवण्यात आला.

संविधान वाचन आणि सामूहिक कवायत

कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माल्यार्पण करून करण्यात आली.यावेळी उपस्थित सर्वांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले. शाळेच्या मैदानावर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांच्या तालावर सादर केलेली सामूहिक कवायत उपस्थितांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली.प्रभात फेरी व क्रीडा गौरव
विद्यालयाच्या वतीने शहराच्या मध्यवर्ती भागातून 'प्रभात फेरी' काढण्यात आली,ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी देशप्रेमाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.तसेच गांधी चौक येथील सार्वजनिक ध्वजारोहण कार्यक्रमातही विद्यालयाने सक्रिय सहभाग दर्शविला.विशेष उल्लेखनीय म्हणजे, राज्यस्तरीय शालेय आष्टेडू आखाडा क्रीडा स्पर्धा मध्ये प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा भारत सेवक शिक्षण संस्थेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
या सोहळ्याला संस्थेचे पदाधिकारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक,माजी मुख्याध्यापक,सर्व शिक्षक,कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!