बसस्थानकाजवळील तलावाच्या दुर्गंधीबाबत विद्यार्थ्यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

 बसस्थानकाजवळील तलावाच्या दुर्गंधीबाबत विद्यार्थ्यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

दहावीच्या विद्यार्थ्यांनी दाखवली नागरी जबाबदारी

बसस्थानकाजवळील तलावाच्या दुर्गंधीविरोधात मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन

सेंट अ‍ॅन्स कॉन्वेंट, मूलच्या विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम


मूल (जि. चंद्रपूर):

आजच्या मोबाईल आणि सोशल मीडियाच्या युगात बहुतांश तरुण पिढी स्वतःपुरती मर्यादित असताना, मूल शहरातील सेंट अ‍ॅन्स कॉन्वेंट शाळेतील इयत्ता दहावीतील विद्यार्थी–विद्यार्थिनींनी सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.

मूल बसस्थानकाजवळ असलेल्या तलावातून येणाऱ्या तीव्र दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याची गंभीर बाब लक्षात घेऊन या विद्यार्थ्यांनी थेट नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे सुस्पष्ट, मुद्देसूद व अभ्यासपूर्ण निवेदन सादर केले.

तलावात साचलेले पाणी व कचरा टाकण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून, बसस्थानक परिसर हा वर्दळीचा असल्याने प्रवासी, दुकानदार व स्थानिक रहिवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या परिस्थितीमुळे मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांचा धोका वाढत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांनी निवेदनात तलाव स्वच्छ करणे, कचरा हटवण्यासाठी नियमित देखरेख ठेवणे, तलावाला कुंपण घालणे, अतिक्रमण रोखणे, कचराकुंड्यांची व्यवस्था करणे व कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्याची मागणी केली आहे.

ही संकल्पना विद्यार्थ्यांची स्वतःची असून, नागरी समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

निवेदन सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अक्षरा कटककर, रेश्मा अन्सारी, मयुरी खानोरकर, संस्कृती गेडाम, निर्जा जुमडे, माही कामडी, विहंग अडकिने, सुजल केशवाणी व आरुष बंबोले यांचा समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी सेंट अ‍ॅन्स कॉन्वेंट, मूल येथील आहेत.

ही संकल्पना कोणत्याही राजकीय किंवा दबावगटाची नसून, शुद्ध विद्यार्थ्यांच्या संवेदनशील मनातून सुचलेली पर्यावरण रक्षणाची आणि नागरी जबाबदारीची जाणीव आहे.

“समस्या पाहून गप्प बसणे नव्हे, तर ती योग्य पद्धतीने प्रशासनापर्यंत पोहोचवणे,” हे या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे.

नगरपरिषदेने या समस्येची दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!