चांदली बुज. येथे दारूचा महापूर - दारुड्यांसाठी आहे कॅशलेस सुविधा


सावली - सावली पोलीस स्टेशन अंतर्गत चांदली बुज. येथे दारुविक्रीला ऊत आला असून ५-६ दारुविक्रेते अवैध दारुविक्री करीत आहेत. दारू खरेदी करा आणि रोख नसेल तर ऑनलाईन पेमेंट करा असा कॅशलेस सुविधेचा पर्याय दारुविक्रेत्याकडून असल्यामुळे दारुडे फार जिंगाट होत असल्याचे चित्र आहे. मात्र पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते.

      सरकारी परवाना असणाऱ्या दारू दुकानातूनच किरकोळ दारुविक्री करण्याची परवानगी असते. मात्र सरकारी परवाना असलेले दारू दुकानदार तस्कराच्या माध्यमातून गावागावात दारू पुरवठा करतात. यासाठी पोलिस प्रशासनाला आर्थिक रसद पुरविल्या जाते त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून तस्करीकडे दुर्लक्ष केल्या जाते. चांदली बुज. येथे ५-६ अवैध दारुविक्रेते असून दारूचा महापूर आहे. अवैध दारू विक्रेते ऑनलाईन जमान्यात मागे राहिलेले नसून दारूची मोबाईल अँप, फोन पे, गूगल पे, युपीआयच्या माध्यमातून ऑनलाईन पेमेंटही घेतल्या जाते. मात्र पोलिसांना हप्ता रोखच द्यावा लागत असल्याचेही विक्रेते सांगतात. काही लोकं व्यसमुक्तीचा संकल्प करीत दारूमुक्तीकडे वाटचाल करीत आहेत मात्र दारू सुरु असल्यामुळे व्यसमुक्तीत अडथळा होत आहे. दारुमुळे संसार उध्वस्त होत असल्याने महिला वर्गाकडून संताप व्यक्त करत दारूबंदीची मागणी होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!