तालुका शालेय खो-खो स्पर्धेत नव विदर्भ क्रीडा मंडळाचा डंका

वैनगंगा विद्यालय व आनंदम विद्यालयाच्या प्रतिनिधित्वातून १४, १७ व १९ वर्षाखालील मुलांचे संघ प्रथम; सर्व संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा अंतर्गत खो-खो सामने दिनांक. १८ सप्टेंबर २०२५ रोजी गांधी विद्यालय, कोंढा येथे घेण्यात आले. या स्पर्धेत नव विदर्भ क्रीडा मंडळ, पवनीचे खेळाडूंनी वैनगंगा विद्यालय व आनंदम विद्यालय, पवनीचे प्रतिनिधित्व करीत सहभाग घेतला होता.

उत्कृष्ट कामगिरी करत १७ वर्षाखालील व १९ वर्षाखालील मुलांच्या गटातील संघांनी (वैनगंगा विद्यालय प्रतिनिधित्व) तसेच १४ वर्षाखालील मुलांच्या गटातील संघाने (आनंदम विद्यालय प्रतिनिधित्व) प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिन्ही विजयी संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
नव विदर्भ क्रीडा मंडळाचे खेळाडू गेल्या चार वर्षांपासून आंतरराष्ट्रीय खो-खो खेळाडू दिलराजसिंग सेंगर यांच्या मार्गदर्शनाखाली सक्सेना प्राथमिक शाळा, पवनी येथे नियमित मोफत प्रशिक्षण घेत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीवर यश मिळवले असून आता तालुका स्तरावरील या कामगिरीमुळे मंडळाच्या खेळाडूंच्या आत्मविश्वासात मोठी भर पडली आहे.

या यशाबद्दल नव विदर्भ क्रीडा मंडळ, पवनी तर्फे तसेच वैनगंगा विद्यालय आणि आनंदम विद्यालयाचे संचालक व प्राचार्य यांच्या कडून खेळाडू व प्रशिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!