कवितेच्या घराचे बापुरावजी पेटकर काव्य पुरस्कार जाहीर
राजगडकर, वाघमारे, गायकवाड, भावसार, काळे, दामोधरे ठरले पुरस्कारांचे मानकरी
तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - महाराष्ट्राच्या काव्यक्षेत्रात नवनव्या उपक्रमांसाठी चर्चेचा विषय असलेल्या कवितेच्या घराच्या वतीने देण्यात येणाऱ्या सन २०२५ च्या बापुरावजी पेटकर राज्यस्तरीय उत्कृष्ट काव्य पुरस्काराची घोषणा करण्यात आली.चंद्रपूर येथील मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग अॅण्ड फार्मसी येथे आयोजित घोषणा कार्यक्रमात पुरस्कार जाहीर करण्यात आले.या प्रसंगी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, श्रीमती रोकसाना सिंग, प्रसिद्ध समीक्षक प्रा. श्रीकांत पाटील, प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. वासुदेव गाडेगोणे , सुप्रसिद्ध सर्जन डॉ. माधुरी मानवटकर, सुप्रसिद्ध भूलतज्ज्ञ डॉ. प्रकाश मानवटकर, कवितेच्या घराचे कार्यवाह डॉ. प्रमोद नारायणे, संस्थापक श्रीकांत पेटकर मंचावर उपस्थित होते. बापुरावजी पेटकर उत्कृष्ट कवितासंग्रह पुरस्कार प्रभू राजगडकर (नागपूर ) यांच्या 'येथे आमचाही श्वास कोंडतो आहे' या कविता संग्रहाला जाहीर झाला आहे. बापुरावजी पेटकर उत्कृष्ट गझलसंग्रह पुरस्कार गजानन वाघमारे (यवतमाळ ) यांच्या 'भुकेचा केंद्रबिंदू' या गझलसंग्रहाला, उत्कृष्ट बालकवितासंग्रह पुरस्कार प्रसेनजित गायकवाड (नागपूर) यांच्या 'तसे मी काय करू' या बाल कवितासंग्रहाला जाहीर झाला असून बापुरावजी पेटकर 'राज्यस्तरीय विशेष काव्य' पुरस्कारासाठी किरण भावसार (नाशिक) यांच्या 'घामाचे संदर्भ' हा कवितासंग्रह, नंदकिशोर दामोधरे (अमरावती) यांचा 'किनारे सरकत आहेत' हा गझलसंग्रह तसेच मोहन काळे (नवीमुंबई) यांचा ' एकदा आपणच व्हावे मोर' हा बालकवितासंग्रह निवडण्यात आले आहे. राज्यस्तरीय उत्कृष्ट काव्य पुरस्कारासाठी प्रत्येकी ५,००० रूपये रोख राशी, मानपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तर विशेष पुरस्कारासाठी सन्मानचिन्ह व मनपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारांसाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील कवींकडून कडून व प्रकाशकांकडून १५८ काव्यसंग्रह प्राप्त झाले होते. पुरस्कार निवड समितीचे परीक्षक म्हणून अकोला येथील प्रसिद्ध साहित्यिक व समीक्षक डॉ. अशोक इंगळे, वर्धा येथील प्रसिद्ध गझलकार संजय इंगळे तिगावकर तसेच मुंबई येथील साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कवी एकनाथ आहाड यांनी उत्कृष्ट कविता संग्रह पुरस्कारांसाठी निवड केली. शनिवार दि. ४ ऑक्टोंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता कवितेचे घर, शेगांव(बु.), त. वरोरा, जि. चंद्रपूर येथे आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवर साहित्यिकांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल असे कवितेच्या घराचे श्रीकांत पेटकर, कार्यवाह प्रा. डॉ. प्रमोद नारायणे, संकल्पनाकार किशोर पेटकर, या कार्यक्रम प्रमुख डॉ. संदीप भेले, संयोजक विकास जवादे व सूर्यकांत पाटील, राजू मांडवकर यांच्या वतीने कळविण्यात आले आहे. पुरस्कारप्राप्त कवींचे महाराष्ट्रातील मान्यवर साहित्यिकांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!