शहरातील सांस्कृतिक बदल: शारदोत्सव ते दुर्गोत्सव

मुल शहरातील उत्सव संस्कृतीतील बदल : शारदोत्सवापासून दुर्गोत्सवापर्यंतचा प्रवास


मुल शहरातील उत्सव संस्कृती केवळ धार्मिक श्रद्धेवर आधारलेली नव्हती, तर ती सामाजिक जीवनाची दिशा ठरवणारी होती. गणेशोत्सव संपल्यानंतर सुरू होणारा शारदोत्सव हा त्या काळातल्या सांस्कृतिक आयुष्याचा अविभाज्य भाग होता. वार्डागणिक महिलांचे मंडळ तयार होऊन शारदा देवीची प्रतिष्ठापना होत असे. शाळांतही ही परंपरा दृढ होती. प्रसन्न मुद्रेतील, हातात वीणा घेतलेली शारदा देवी म्हणजे ज्ञान, संस्कार आणि सौम्यता यांचे प्रतीक मानले जाई.

"माते तुझं पाहूनीया जीव तोशिला, ओवाळू आरती शारदे तुला…" ही पारंपारिक आरती आणि देवीचे विसर्जन करताना मागे हळूहळू चाला मुखाने शारदा बोला.. हा भक्ती भाव साऱ्यांच्या तोंडी असायचे
अशा भक्तिगीतांनी वातावरण भारावून जायचे. हा उत्सव महिला-नेतृत्वाचा होता. देवीची प्रतिष्ठापना, आरत्या, निधी संकलन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विसर्जन – प्रत्येक टप्प्यात महिलांचे नेतृत्व आणि निर्णयक्षमता ठळकपणे दिसत असे. त्यामुळे महिलांना संघटन, नेतृत्व व सामाजिक सहभागाचे व्यासपीठ मिळायचे.

मात्र, अलिकडच्या एक-दोन दशकांत मुल शहरातील ही सांस्कृतिक परंपरा हळूहळू बदलली आहे. शारदा देवीच्या जागी दुर्गादेवी प्रतिष्ठापनेची परंपरा स्थिरावली आहे. आज शहरात नवरात्रीचा जागर, दुर्गा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गुजरातचा गरबा, बंगालची दुर्गा पूजा यांची छटा या उत्सवात दिसू लागली आहे. स्थानिक परंपरा आणि बाह्य सांस्कृतिक प्रभाव यांच्या मिश्रणाने नवरात्रीचा उत्सव आता अधिक रंगतदार झाला आहे.

या बदलातील आणखी एक महत्त्वाची बाजू म्हणजे उत्सव व्यवस्थापनाचे रूपांतर. शारदोत्सवात महिलांचा सहभाग निर्णायक होता. देवीची स्थापना, आरत्या, सांस्कृतिक कार्यक्रम, निधी संकलन ते विसर्जनपर्यंत प्रत्येक काम महिलांच्या मार्गदर्शनाखाली होत असे. पण दुर्गोत्सवात हे चित्र बदलले आहे. आता नियोजन, व्यवस्थापन आणि नियंत्रण पुरुषांच्या हाती आले आहे. मंडप उभारणीपासून ते राजकीय पाठबळापर्यंत सर्व काही पुरुष वर्चस्वाखाली पार पाडले जाते. या उत्सवात स्थानिक राजकारणाची किनारही स्पष्टपणे जाणवते.

त्यामुळे मुलच्या उत्सव संस्कृतीत दोन महत्त्वाचे बदल दिसतात –

1. देवतेचा बदल : शारदा देवीकडून दुर्गादेवीकडे झालेला प्रवास.


2. सत्तेचा बदल : महिलांच्या नेतृत्वातून पुरुषांच्या नियंत्रणाकडे झालेला कल.

राजकीय किनार
महत्त्वाची बाब म्हणजे राजकारणाची सांगड. शारदोत्सव तुलनेने राजकीय हस्तक्षेपापासून दूर होता. तो महिलांच्या संघटनांमुळे अधिक सामाजिक स्वरूपाचा होता. पण दुर्गोत्सवाच्या वाढत्या भव्यतेमुळे स्थानिक राजकीय पक्ष – विशेषतः भाजप आणि काँग्रेस – यांनी यात सक्रिय सहभाग घेणे सुरू केले. देणगी, जाहिराती, शुभेच्छा फलक आणि प्रमुख पाहुणे या माध्यमातून हा उत्सव राजकीय शक्ती प्रदर्शनाचे साधन झाले आहे.

हा बदल चांगला की वाईट, यावर मतभेद होऊ शकतात. दुर्गोत्सवाने मुल शहरात नवी ऊर्जा, उत्साह आणि कलात्मकता आणली आहे, तर शारदोत्सवाने कधी काळी महिलांना मिळालेले सांस्कृतिक नेतृत्व हळूहळू हरवत चालले आहे.

मुल शहरातील उत्सव परंपरेतला हा प्रवास केवळ धार्मिक नाही, तर सामाजिक-सांस्कृतिक बदलाचं प्रतीक आहे. परंपरेतून आधुनिकतेकडे जाणाऱ्या या प्रवासात, भविष्यात महिलांना पुन्हा समान सहभाग मिळतो का, हा एक विचार करण्यासारखा मुद्दा ठरतो.

मुल शहरातील हा बदल केवळ धार्मिक देवतेच्या बदलाचा नसून, तो सामाजिक-सांस्कृतिक परिवर्तनाचा आरसा आहे. शारदा देवीच्या उत्सवातून महिलांना मिळालेलं नेतृत्व हरवून गेलं असलं, तरी दुर्गोत्सवाने शहराला नवा उत्साह, बाह्य संस्कृतींचा अनुभव आणि भव्यता दिली आहे.
भविष्यातील खरी गरज ही आहे की, दुर्गोत्सवाच्या या नव्या रंगतदार परंपरेतही महिलांना पुन्हा निर्णायक स्थान मिळावं आणि उत्सव केवळ राजकीय शक्तिप्रदर्शन न राहता सामाजिक एकतेचं प्रतीक व्हावं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!